पुणे-राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.ब्राह्मण महासंघाने मात्र या बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी पवार यांचे निमंत्रण नाकारले असून या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आनंद दवे म्हणतात ,’ समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू. पण अगदी परवाच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना त्यांचे वक्तव्य माघार घ्यायला सांगायला हवे होते. उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिलं.देवांचा बाप असल्याचा पण साक्षात्कार शरद पवार यांना अगदीच काल, परवा झाला. केतकी चितळे पूर्णतः चुकल्याचे मान्य आहे. आपण पण तिच्यावर टिकाच केली. पण शरद पवार यांनी जर केतकी यांना माफ करून गुन्हे मागे घेण्यास सांगितले असते तर ते खूप मोठे झाले असते. पण केतकी यांच्यावर २८ ठिकाणी गुन्हे दाखल केले, त्याच पोलिसांनी मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही. आपल्या आंदोलनानंतर राज्यभर समाज जागा झाला, पण तरीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली (दिवंगत माणसावर टीका करत नाहीत शक्यतो कोणीच)आपला शरद पवार यांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही. पण राजकीय फायद्यासाठी शरद पवार ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी आधी मिटकरी, भुजबळ यांच्या वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे. अर्थात ज्या ज्या वेळेस शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीय उल्लेख केले आहेत त्या वेळेस अन्य राजकीय पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प असतात हे सुद्धा तितकच दुर्दैवी सत्य. त्यामुळे शरद पवार यांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असे आम्हाला वाटते, असे दवे यांनी स्पष्ट केले.