तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन
पुणे-सध्या पावसाळा सुरू असून शहरात विविध ठिकाणी दररोज झाडपडीच्या 60 ते 70 घटना घडत असूनही पालिका प्रशासन सुस्त असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.त्यामुळे वर्षानुवर्षे पावसाळ्यात भेडसावणाऱ्या या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी दिला आहे
संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी म्हटले आहे की,सध्या शहरात पावसाळा पाहता,दररोज विविध ठिकाणी झाडपडीच्या 60 ते 70 घटना घडत आहेत.अग्निशामक दलाकडे रोज अनेक कॉल येत आहेत.सुदैवाने झाडपडीच्या घटनांमध्ये अजूनतरी जीवितहानी झालेली नसली तरी नागरिकांच्या वाहनांचे व अन्य मालमत्तांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.वास्तविक झाडपडीच्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सक्षम अशी कोणतीही यंत्रणा नाही.त्यात झोपडपट्टी ,वसाहत ,सोसायटी भागात असो किंवा अन्य ठिकाणी धोकादायक ठरत असलेल्या वृक्षांची छाटणी अथवा धोकादायक ठरणारे वृक्ष हटविले जात नसल्याचे वास्तव आहे. प्रमुख रस्त्यांसह वसाहती ,झोपडपट्टी तसेच सोसायटी भागातील धोकादायक वृक्षांची छाटणी किंवा ते हटविणे याबाबत पालिका प्रशासनाकडून आमची जबाबदारी नाही असे कारण दिले जाते. त्यामुळे वसाहत,झोपडपट्टी, सोसायटी भागातील नागरिकांनी वृक्षांची छाटणी कशी करावी हा मोठा पेच निर्माण झालेला आहे. वृक्ष छाटणीच्या परवानगीसाठी उद्यान विभागाकडे खेटे घातल्यानंतर खासगी ठेकेदारांचे संपर्क क्रमांक दिले जातात मग त्याचे पैसे कोणी अदा करायचे हाही प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. वृक्ष छाटणीसाठी नागरिकांकडून वारंवार तक्रार, निवेदने देवूनही प्रशासन आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळयात हाच प्रकार सुरू आहे. वास्तविक करदात्या नागरिकांच्या जिवितेची ,सुरक्षिततेची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून शहरातील विविध ठिकाणी असणारे धोकादायक झाडे हटवण्याची कारवाई करण्यात यावी; अन्यथा पुणेकरांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. उद्या कोणती जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील. असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.

