सहा दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे प्राणांतिक उपोषण सुरूच
पुणे : कामगार हा बाजारपेठेतील प्रमुख ग्राहक आहे. त्याच्याच हात पैसे राहिले नाहीत तर भारताची अर्थव्यवस्था ही ढासळेल. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात शिंदे सरकारने या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडावी व कामावरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत या 270 कामगारांना कामावर घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका भोसले यांनी घेतली आहे.
केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणा विरोधात तसेच कोरोना काळात नोकरी वरून काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर परत घ्यावे यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे गेल्या सहा दिवसांपासून कामगार आयुक्त कार्यालय पुणे येथे प्राणांतिक उपोषणाला बसले आहे. दरम्यान, आज या कामगार उपोषणा ठिकाणी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बुधाजिराव मुळीक यांनी येवून भोसले यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच नवनियुक्त कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याशी देखील चर्चा झाली. मात्र, आता आश्वासन नको कृती हवी असे म्हणत यशवंत भोसले हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
यावेळी बोलताना कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, केंद्रातील नवीन कामगार कायदे महाराष्ट्रात लागू झाले तर fix term employment या नवीन कायद्यामुळे 5 व 3 वर्षांकरिताच विविध कंपनी व विविध उद्योग समूहात युवकांना नोकरी मिळणार आहे, पुढे पर्मनंट कामगार पद्धत बंद होईल. कामगार कायद्याचे संरक्षण निघून गेल्यास भविष्यात देशातील युवा पिढीची प्रचंड पिळवणूक होणार तर आहेच परंतु आत्ताचे कामगार उध्वस्थ होतील. जानेवारी 2023 ला संभाव्य नवीन कामगार कायदे महाराष्ट्रात लागू झाले तर त्याची झळ संपूर्ण राज्यातील श्रमिक व नोकरीकरिता बाहेर पडणाऱ्या करोडो तरुणांना पडणार आहे. कामगार मुख्य ग्राहक आहे बाजारपेठेचा त्याच्याच हात पैसे नाही राहिले तर भारताची अर्थव्यवस्था ही ढासळेल. छोटे व्यावसाय बंद पडतील त्यामुळे किमान व्यावसाईकांनी तरी या कामगार कायद्याला विरोध करावा अशी मागणी, यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे.
दरम्यान, यशवंत भाऊ भोसले यांच्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध कामगार संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते भोसले यांच्या भेटीला येत आहेत. कामगार नेते आणि कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजिराव मुळीक, माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे पुतणे पंडितराव पाटील, रिपब्लिक पार्टी (आठवले गट) स्वानंद राज्यपाठक, रामराजे भोसले, प्रशांत क्षीरसागर आदींनी पाठिंबा दिला आहे.