पुणे- महापालिका निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे प्रदेश कॉंग्रेसला पाठवा अशा आशयाचे शहर कॉंग्रेसला प्रदेश कॉंग्रेसने दिलेले पत्र चक्क व्हायरल झाले आणि शहर कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यात एकच गोंधळ उडाला आहे, अजून प्रभाग रचना कोणास ठाऊक नाही , आणि इच्छुकांचे अर्ज मागविणे कार्ड कमिटी पुढे ते ठेवणे , कार्ड कमिटीत मुलाखती होणे , नंतर कार्ड कमिटी द्वारे नावे प्रदेश मार्फत श्रेष्ठींकडे जाणे हि कॉंग्रेसच्या निवडीची परंपरा असताना तिला छेद देत हा गोंधळ उडविण्यामागे नेमके रहस्य काय दडले आहे याचा पेच राजकीय समीक्षकांना पडला आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट समोर असताना कॉंग्रेसमध्ये उडालेला हा गोंधळ पाहून विरोधक मात्र ‘मजा ‘ घेत असल्याचे बोलले जाते आहे .
पीएम मोदींची घटणारी लोकप्रियता ,कन्हैया ,हार्दिक पटेल यांच्या सहभागा बरोबर वेळोवेळी दिसलेला प्रियांका,राहुल यांचा यूपीतील आक्रमकपणा, महागाई, बेरोजगारीने हैराण झालेली जनता या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये काहीसे उत्साही वातावरण असल्याने काही विरोधकांनी फेकलेल्या जाळ्यात अडकून कॉंग्रेसच्याच काहीजणांनी शहर कॉंग्रेस मध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात यश मिळविले असल्याचे चिन्ह आहे . महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सुरु झालेले हे गोंधळाचे वातावरण पाहूनही पृथ्वीराज चव्हाण , अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात या सारखी जुनी मातब्बर नेते मंडळीही डोळ्यावर कातडे ओढून का आहेत याचाही उलगडा अद्याप होताना दिसलेला नाही .पुणे शहर कॉंग्रेसने गेली काही वर्षे शहरभर जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली . महापालिकेच्या सभागृहात देखील कॉंग्रेसच्या ३/४ नगरसेवकांनी १०० नगरसेवकांना सातत्याने टक्कर दिली . अनेक घोटाळे उघडकीस आणले , अनेक शेकडो कोटींनी फुगविलेली टेंडर्स अगदी देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेही रद्द करण्यास भाग पाडले . राष्ट्रवादीने कधी यात त्यांना साथ दिली तर कधी त्यंचा हाथ सोडला पण कॉंग्रेसचे शिलेदार मागे हटले नाहीत .महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या तशा कॉंग्रेस भवनात ५/७ वर्षे न फिरकलेले चेहरे अलीकडे दिसू लागले . अशा अवस्थेत प्रदेशाध्यक्षांनी दिलेला एकला चलो चा नारा आणि आता कॉंग्रेसने इच्छुकांची मागविलेली नावे यामुळे एकंदरीत कॉंग्रेसच्या गोटात गोंधळ निर्माण झाला आहे. अजून प्रभाग कोणाला समजलेला नाही , अजून एकला चलो आहे कि आघाडी आहे याबाबतही संदिग्धता आहे.त्यात ओमायक्रोन,कोरोना चे थैमान आहे आणि दुसरीकडे मात्र कॉंग्रेसने इच्छुकांची नावे मागविल्याने अनेकांची चलबिचल झाली आहे . सध्या महापालिकेत कॉंग्रेसचे १० नगरसेवक आहेत . या १० चे किमान ५० करायचे असतील तर कॉंग्रेसला त्याबाबतची जबाबदारी कोण एखाद्या मातब्बर नेत्यावर सोपवावी लागणार आहे . हीच बाब संपूर्ण महाराष्ट्रातही कॉंग्रेसला करावी लागणार आहे . महाराष्ट्रातील ३/४ जिल्हे एखाद्या नेत्याकडे अशा पद्धतीने नेत्यांना जबाबदारी सोपवून कॉंग्रेसला आपली ताकद वाढवावी लागणार आहे. यासाठी ज्यांच्याकडे मंत्रिपदे आहेत असे विश्वजित कदम , विजय वडेट्टीवार व इतर तसेच पृथ्वीराज चव्हाण , अशोक चव्हाण , बाळासाहेब थोरात,सुशीलकुमार शिंदे अशा नेत्यांनी ठराविक ठराविक विभागांची जबाबदारी घेतली तर कॉंग्रेसची महाराष्ट्रातील ताकद वाढू शकणार आहे . हे सर्व समजूनही अशा पद्धतीने निर्माण होऊ पाहणारा गोंधळ कॉंग्रेसला मागे खेचल्या शिवाय राहणार नाही असे मत हि राजकीय समीक्षकांनी व्यक्त केले आहे.