दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

अकोला – राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पुरोगामी विचारांचं सरकार आहे. कल्याणकारी राज्य म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. या राज्यातील दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी हे शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच अकोला जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षणाचा उपक्रमही राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबतही शासन लवकरच निर्णय घेऊ,असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११९ दिव्यांग बंधू भगिनींना इलेक्ट्रिक फिरते तीन चाकी विक्री क्रेंद्र वितरण करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते. जिल्हा नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात आयोजित या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधान सभा सदस्य आ. रणधीर सावरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सुरुवातीला सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते फिरते विक्री केंद्राच्या चावीचे प्रतिकात्मक वितरण करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा नियोजन समिती मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणुन राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मिळून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांच्या सदस्य असलेल्या महिलांना वा त्यांच्या कुटुंबातील दिव्यांग सदस्यांपैकी ११९ जणांना ही बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल तथा फिरते विक्री केंद्र वितरीत करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात मंगला सुरेश बुंदेले व अब्दुल रशीद या दिव्यांगांना ही चावी देण्यात आली. या उपक्रमासंदर्भात माविमंच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे यांनी माहिती दिली. तसेच एका चित्रफितीद्वारे सादरीकरण केले.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी डी.एम पुंड यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या दिव्यांग सर्व्हेक्षण या उपक्रमाविषयी माहिती सांगून त्याचे एका चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. तसेच दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे प्राप्त युडीआयडी कार्ड अर्थात दिव्यांगत्व ओळखपत्र बद्रुद्दीन अहमद व संजना बोरकर या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

हीच जिजाऊ माँसाहेबांना खरी आदरांजली- उपमुख्यमंत्री पवार

आपल्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्याप्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला. जिजाऊ माँसाहेबांच्या याच स्वाभिमानी विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. त्यांच्याच जयंतीदिनी दिव्यांग भगिनींना ई-ट्राय सायकल वितरण करुन स्वाभिमानाने आपली उपजिविका चालविण्याची संधी यानिमित्ताने देणे हीच जिजाऊ माँसाहेबांना खरी आदरांजली आहे. या उपक्रमामुळे जिजाऊच्या लेकींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. आता त्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतील. स्वाभिमानानं आणि अभिमानानं जीवन जगतील, अश्या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना शारिरीक मदतीच्याबरोबरीनं त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं आहे. त्यासाठी समाजाने आपली जबाबदारी ओळखावी. दिव्यांग बांधवांना लागणाऱ्या विविध उपकरणांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येत असतात. तेव्हा दिव्यांग बांधव आणि दानशूर व्यक्ती, संस्था यांच्यातला दुवा बनण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले. दिव्यांगांच्या विकासासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती देतांना ते म्हणाले की, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. राज्यातील बेरोजगार दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदरानं कर्ज उपलब्ध करून देणं, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविणे इ. उपक्रम या महामंडळामार्फत राबविले जातात. दिव्यांगांना समाजाचा उत्पादक घटक बनविणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, स्वाभिमानानं उभं करणं हाच आपला उद्देश आहे. दिव्यांगांमधील गूण ओळखून त्यांना संधी उपलब्ध करुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक असतं, यासाठी समाजाने एकत्र आलं पाहिजे. दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकली, श्रवणयंत्रे , व्हीलचेअर, ब्रेल साहित्य, पंढरी काठी, स्वयंचालीत जयपूर फूट, केलीपर्स यांसारखी साधनं विनामुल्य उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा लाभ योग्य आणि पात्र दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांना स्वाभिमानानं उभं करण्याची गरज आहे. हे काम सेवाभावाने करत असल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचे कौतुक केले. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र भवन उभारणे, दिव्यांगांचे सर्व्हेक्षण करणे याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यांगांना विकासाची पुरेपूर संधी देऊ- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

यावेळी बोलतांना सामाजिक न्याय मंत्री मुंडे म्हणाले की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागामार्फत दिव्यांगांच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जातात. दिव्यांगांना लागणारी विविध कृत्रिम अवयवे, यंत्रे इ. उपलब्ध करुन देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येतात. ह्या व्यक्ती, संस्था आणि दिव्यांग व्यक्ती यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी ‘महाशरद’ हे पोर्टलही शासनाने सुरु केले आहे. दिव्यांगांना उपकरणे व यंत्रांच्या माध्यमातून सामान्य जीवन जगता यावे, देशाचे नागरिक म्हणून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. यासोबतच दिव्यांगांना एक वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लातूर जिल्ह्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ऑफिजम पार्क उभारण्यासाठी प्रयत्न आहेत. त्यामुळे लहान वयातच दिव्यांगत्व लक्षण ओळखून त्यावर लगेचच इलाज करण्याची सुविधा उपलब्ध होते. तसेच दिव्यांगांचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणे इ. उपक्रमांसाठी निधीची तरतूद करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

दिव्यांग सर्व्हेक्षणाचा उपक्रम राबविणारा ‘अकोला’ हा पहिला जिल्हा-पालकमंत्री कडू

पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थितांशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिव्यांगांना फिरते विक्री केंद्र वाटप करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम अकोला जिल्ह्यात राज्यात प्रथमच राबविण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या विकासासाठी कृतिबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी मोलाची माहिती आवश्यक असते ती माहिती दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे उपलब्ध करणारा अकोला हा पहिला जिल्हा ठरला,अशा शब्दात त्यांनी कौतुक केले. दिव्यांगांच्या विकासासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून निधी द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग संशोधन केंद्र बांधावे,असे आवाहन केले तसेच त्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे दिव्यांग कल्याणाच्या योजना राबविल्याबाबत कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास कोविड नियमांचे पालन करीत दिव्यांग व्यक्ती, त्यांचे सहायक तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा:पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक एकबोटेंना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मृत्युपूर्व दृश्यांनी कबरीबाबतच्या भावना तीव्र...

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, दि. १५ मार्च २०२५: तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही...

धायरीच्या मध्यवस्तीतील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प न हलविल्यास जन आंदोलन

आम आदमी पक्षाचा इशारा पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर...