पुणे, ता. २१ : मन:शांती, शारीरिक स्वास्थ्य आणि कामातील उत्साह मिळविण्यासाठी योगाच्या रुपाने भारताने जगाला ‘सॉफ्ट पॉवर’ची भेट दिली असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने जागतिक योगदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. या कार्यक्रमात १०० कर्मचारी सहभागी झाले होते. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक संतोष ढोके, व्यवस्थापकीय संचालक गगन मलिक, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. संदीप बुटाला. पतंजली योग संस्थेचे अंकुश नवले उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, योगा ही भारताची ताकद आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. नियमित योगासने केल्याने दिवसभर उत्साहात राहातो, आनंद आणि चपळता वाढते. योगाचा प्रसार करण्यासाठी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव १९० देशांसमोर ठेवला. त्याला जगाने मान्यता दिली. भारताची ही प्राचीन परंपरा सर्व देशांनी स्वीकारली. आज १९३ देशांत योग दिनाचे कार्यक्रम होत आहेत.