कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा; माध्यमांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई दि ३ : कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत, ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज वृत्तपत्रांचे  संपादक, मालक, वितरक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सूचना स्वीकारल्या.

संसर्गाचे राजकारण रोखा

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला कुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार, आपण वर्षभरापासून सातत्याने आरोग्याचे नियम पाळण्यास सांगतो आहोत. मधल्या काळात आपण ते गांभीर्याने पाळल्याने साथ बऱ्यापैकी आपण रोखू शकलो. मात्र आता विषाणूच्या नव्या अवतारामुळे आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको. आपण विविध सूचना दिल्यात त्या  सरकार निश्चितपणे अंमलात आणण्यासंदर्भात विचार करेल. मात्र कोरोनाशी लढताना भीतीचे वातावरण नको तर एकमेकांची योग्य काळजी कशी घेऊ यादृष्टीने समाजात जागृती निर्माण झाली पाहिजे आणि त्याकामी  माध्यमांनी सहकार्य करावे.

आज आपण ऑक्सिजन उत्पादन कसे वैद्यकीय कारणांसाठी राखून ठेवता येईल, खासगी व बंधपत्र-करार स्वरूपाने डॉक्टर्सच्या सेवा कशा उपयोगात आणता येईल, त्याचाही विचार करीत आहोत. ज्येष्ठ डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सेवाही कशा घेता येतील, ई- आयसीयूचा उपयोग कसा करता येईल, तेही पाहतो आहोत. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेचे हित पाहूनच सरकारने भविष्यात काही निर्णय घेतल्यास माध्यमांनीदेखील त्यामागील हेतू पाहावा व वस्तुस्थिती मांडावी.

या बैठकीत लोकांची प्रतिरोधक शक्ती वाढविण्यासाठी उपाय, तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त सुयोग्य वापर, टेलिमेडिसिन, सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, कामाच्या वेळांची विभागणी, स्थानिक पातळीवर नियंत्रणाला प्राधान्य, दुकानदार, विक्रेते यांच्या चाचण्या करून त्यांना विक्रीची परवानगी, कोविड केंद्रांसंदर्भातील धास्ती कमी करणे, वारंवार जनतेशी संवाद साधणे अशा विविध सूचना देण्यात आल्या.

राज्याच्या हिताच्या निर्णयाला व्यायामशाळा, जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘जान है तो जहान है..’या उक्तीनुसार जीव राहिला, तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तिनिशी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

राज्यातील व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना परिस्थितीबाबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय यांच्यासह महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनेचे अध्यक्ष निखिल राजपुरीया, करण तलरेजा, अभिमन्यू सावळे, योगिनी पाटील, गुरूजीत सिंह, शालिनी भार्गव, खजानीस महेश गायकवाड, हेमंत दऱडे, राजेश देसाई, श्री. परुळेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, व्यायाम शाळा-जिम चालकांना यापूर्वी ज्या काही सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन होत आहे, ही गोष्टी चांगली आहे. पण आता आपण गतवर्षीच्या पूर्वपदापेक्षाही जास्त बिकट परिस्थितीकडे गेलो आहेत. गेल्यावेळी ज्याला आपण ‘पिक’ परिस्थिती म्हणत होतो. त्याहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटी मुंबईत तीनशे साडेतीनशे रुग्ण आढळत होते. ती संख्या आता साडेआठ हजारांवर गेली आहे. जिममध्ये तुम्ही सर्व सुविधा आणल्या, ट्रेड मिल आणल्या, उपकरण आली, पण चांगला प्रशिक्षक नसेल, तर काय होईल, तशीच स्थिती आता निर्माण होऊ शकते. बेड्स, व्हेंटिलेटर्स, औषधांचा साठा सगळ्या काही गोष्टी सुरळीत करत आहोत. पण डॉक्टर्स, नर्सेस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे कठीण होणार आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जगाने लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारला आहे. आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, आपली सर्व यंत्रणा कोरोनावर काम करते आहे. रुग्ण शोधणे, त्यांचे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगसाठी आरोग्य, पोलीस, महसूल यंत्रणा अथकपणे प्रयत्न करत आहेत. आपण अनेक सुविधा वाढविल्या आहेत. पण रुग्णवाढीमुळे त्याही कमी पडतील की काय अशी शक्यता आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा, बेड्सची संख्या कमी पडू लागली आहे. आहे. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांनाच कोरोनाच्या विरोधात एकजुटीने काम करावे लागेल. हे काम एकतर्फी होऊ शकत नाही. परिस्थिती अशीच राहीली, तर राज्य गर्तेत जाईल. यापूर्वीही निर्बंध आपण हळूहळू लावले होते, आणि पुन्हा हळूहळू शिथिल केले होते. तशीच वेळ आली, महाराष्ट्राच्या हिताचा मार्ग स्वीकारायला हवा. जो निर्णय घेऊ सगळ्यांच्या हितांचा असाच असेल. त्यामध्ये सगळ्यांनी सर्वांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिम संचालक एसओपीचे पालन करत आहेत, हे प्रशंसनीय आहे. बऱ्याच जिम, ज्या विशेषतः छोट्या जागेत आहेत. त्याठिकाणी संक्रमण होण्याची शक्यता आहे. जान है, तो जहान है. त्यामुळे आपल्याला जीवाची काळजी घ्यावी लागेल. पण रुग्णांची संख्या ज्या गतीने वाढते. ते पाहता, अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळणे अवघड होईल. बऱ्याच छोट्या शहरात तज्ज्ञ डॉक्टर्स, आणि उपकरण उपलब्ध नाही. त्यामुळे ही गोष्टही जिम चालकांनी लक्षात घ्यावी. आपण ई-आयसीयू, लसीकरण यामध्ये नवीन पावले टाकतो आहोत. लसीकरणाचे प्रमाण तिप्पट करत आहोत. या सगळ्या गोष्टी करत आहोत. पण आपल्याला या चिंताजनक परिस्थितीवर मात करण्यासाठी कडक निर्बंध लावावे लागतील. यात स्वयंशिस्त हीच महत्त्वाची आहे. यासाठी राज्यसरकारला सहकार्य करावे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख यांनीही जिम चालकांना राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्री आणि शासन घेईल, त्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुख्य सचिव श्री. कुंटे म्हणाले, व्यायाम शाळा, जिमच्या ठिकाणी व्यायामामुळे श्वसनक्रिया आणखी वेगाने होते. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण आणि घालून दिलेल्या नियमांचे आणखी काटेकोर पालन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

असोसिएशनचे सरचिटणीस, साईनाथ दुर्गे यांनी प्रास्ताविक केले. असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजपुरिया म्हणाले, ऑक्टोबरपासून जिम सुरु झाले, त्यावेळेपासून आतापर्यंत दिलेल्या एसओपीचे पालन केले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे आपल्याकडून यापुढे दिल्या जाणाऱ्या निर्देशाचे जरूर पालन करू.

श्री. देसाई, श्रीमती भार्गव, श्री. परुळेकर, आदींनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱे निर्देश काटेकोरपणे पाळले जातील. कोरोना विरोधातील या लढ्यात आम्ही सर्व शासनासोबत आहोत, असे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...