मुंबई- निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला पुरावे मागितले आहेत. निवडणूक आयोगाने 27 ऑगस्टपर्यंत शिवसेनेला प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश दिले होते. तसेच 8 ऑगस्टपर्यंत शिवसेना कुणाची याबाबत पुरावे, कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना केल्या होत्या. या निर्देशाविरोधात आता शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेनिवडणूक आयोगात सुरू असलेल्या कार्यवाहीला शिवसेनेने आव्हान दिले. जिथे शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित आहे, तिथे खरी शिवसेना कोण हे आयोग ठरवू शकत नाही असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे. याच आधारावर ते न्यायालयात जात आहेत.
शिवसेनेची कायदेशीर टीम तयार
उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यांची कायदेशीर टीम तयार आहे. ते लवकरच हस्तक्षेप याचिका न्यायालयात दाखल करणार आहेत. शिवसेना कुणाच्या हक्काची याबाबत पुरावे द्यावे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. याच निर्देशाविरोधात शिवसेना कोर्टात जाणार आहे. यासंदर्भातील अर्ज आज किंवा उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे.
शिंदेंची निवडणूक आयोगात धाव
शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आपल्याकडे 50 आमदार आणि 12 खासदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहुमत सिद्ध करण्याचे लेखी पुरावे मागितले.
शिंदे गटाचा दावा- आम्हीच खरी शिवसेना
एकनाथ शिंदे यांच्या गटाने आधी आमदार फोडले आणि त्यानंतर खासदारांचा वेगळा गट स्थापन केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच आम्ही पक्ष चालवत आहोत, आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.