पुणे-पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर आज सकाळच्या सुमारास ईडीने छापा टाकला.
आज सकाळपासून ईडीचे अधिकारी भोसले यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे आता ईडीच्या निशाण्यावर बांधकाम व्यावसायिक असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांवर ईडीने छापेमारी केली आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने अविनाश भोसले यांची चौकशी केली होती.
दरम्यान ईडीकडून आज सुरू असलेली कारवाई विदेशी चलन प्रकरणी व काही महागड्या वस्तू परदेशातून आणल्याप्रकरणी सुरू असल्याचे समजते. यापूर्वी 2007 मध्ये अशाच प्रकारची चौकशी करण्यात आली होती. आयकर विभागाकडूनही अविनाश भोसले यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत छापेमारी करण्यात आली होती. तर नोव्हेंबर 2020 मध्येही भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक असून रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

