पुणे- निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन राजकीय हेतूने प्रेरित होऊन विशेषतः राष्ट्रवादीच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या २३ गावांच्या महापालिकेत समावेशाचा निर्णय राष्ट्रवादी सह कॉंग्रेस , शिवसेना यांचाही अंगलट येईल असा दावा आज येथे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे .
ते म्हणाले ,’गेल्या एक वर्षाचा महाविकास आघाडी सरकारचा कारभार पाहिला तर पुणे शहराच्या विकासासाठी एकही ठोस प्रकल्प देता आला नाही. उलट भाजपने गती दिलेल्या विविध प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. सरकारमधील घटक पक्षांमध्ये एकवाक्यता नाही. त्यामुळे जनतेच्या मनात या सरकारबद्दल प्रचंड रोष आहे.महाविकास आघाडी करूनही पुणे महापालिकेत यश मिळणार नाही याची जाणीव झाल्याने तातडीने आणि घाईघाईने 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला
मात्र समाविष्ट गावांमध्ये गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असूनही ही गावे मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिली. त्यामुळे समाविष्ट भागातही राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळणार नाही. एकूणच राजकिय हेतूने घेतलेला निर्णय राष्ट्रवादीच्या अंगलट येईल आणि भ्रमनिरास होईल.भागाच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे.

