खासदार संजय राऊत मीडियाशी बोलले तर तुमचा प्रॉब्लेम काय, असा खडा सवाल शुक्रवारी न्यायालयाने केला. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राऊत यांची कोठडी दोन नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीची बोलतीही बंद केली.
ईडी वकीलः राऊत यांना सुनावणीसाठी आणले जाते, तेव्हा ते न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींशी बोलतात. राजकीय वक्तव्ये करतात. तिथे गर्दी होते. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
कोर्टः तुम्ही म्हणता की, राऊतांची राजकीय केस नाही. मात्र, ते खासदार आहेत. ते कोर्टाबाहेर मीडियाशी बोलले, तर तुमची नेमकी अडचण काय? त्यांच्या मीडियाशी बोलण्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम? तुमच्या पोटात का दुखतंय?.
ईडी वकीलः आम्हाला काही हरकत नाही. मात्र, राऊत मीडियाशी बोलल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
कोर्टः सुरक्षेचा प्रश्न म्हणता. ते बोलल्यामुळे इथे काय गोळीबार होईल का? तसे असेल तर लेखी द्या. त्यावर निर्णय घेऊ. कोर्ट बाहेर जाऊन सुरक्षा बघू शकत नाही. अनेकदा इतर आरोपींना चहा पायला नेतात, डबा खातात. तसेच राऊत राजकीय विधान करत असतील तर ईडीला अडचण का? तुम्ही म्हणतात ही राजकीय केस नाही. कोर्टाबाहेरच्या गर्दीवर आम्ही नियंत्रण आणू शकत नाही आणि लोक राऊतांना भेटत असतील, तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
संजय राऊतांच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने आरोप केले आहेत. मात्र, त्याचा कुठलाही संबंध थेट राऊत यांच्याशी लागत नाही. प्रवीण राऊतांना मिळालेले पैसे पीएमसी बँकेसंबंधात होते. त्याच्याशी संजय राऊत यांचा काहीही संबंध नव्हता. मात्र, त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. त्याचे कारण काय, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
प्रवीण राऊत यांच्याकडून खात्यावर पैसे जमा झाले. याचा अर्थ ते गैरव्यवहारासंबंधात आहेत, असे कसे म्हणता येईल. हे पैसे अनेकांनी स्वीकारले. यातल्या दोन व्यक्तींनी पैसे दिले आहेत. मात्र, ते कुठे आहेत, असा सवालही वकिलांनी केला.
सध्याच्या या प्रकरणात पैसे दिले आहेत. मात्र, हे पैसे कोण आणि कुणाला दिले हे स्पष्ट होत नाही. प्रत्येकजण एकमेकांकडे बोट दाखवत आहे. त्यांच्या जबाबात सारखेपणा नाही. विशेष म्हणते ते आपल्या म्हणण्यावर ठाम नाहीत. सारखा जबाब बदलत आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवालही वकिलांनी केला.
स्वप्ना पाटकर आपल्या जबाबाबत कुणालाही भेटले नाही म्हणतात, तर सुजीत पाटकर हे व्यवहार स्वप्ना पाटकरांच्या कार्यालयात झाल्याचे सांगतात. त्यातही पुढे हे व्यवहार स्वप्ना पाटकरांनी केल्याचे ते म्हणतात. हा मुद्दाही राऊत यांच्या वकिलांनी उपस्थित केला.आता न्यायालयाने दोन नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

