मुंबई -कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून रविवारी करण्यात आली होती. यावर फडणवीसांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, ‘येथील शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय हे बोलत असता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात’ ‘तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले मात्र एक फुटकी कवडीही दिलेली नाही. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
पूर आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षाकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
बंगल्यांवर खर्च करताय, शेतकऱ्यांसाठी पैसे का नाहीत?
देवेंद्र फडणवीस यांनी बंगल्यांच्या नूतनीकरणावरही बोट ठेवले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे ही सुरू असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात करायला पाहिजे. मात्र शेतकऱ्यांनादेखील मदत करायला हवी. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.

