श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन
पुणे : गरुड, कलश व यज्ञ स्थापनेसारख्या धार्मिक कार्यक्रमांनी श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाला मंदिरात उत्साहात प्रारंभ झाला. धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसह नानाविध कार्यक्रमांनी हा ब्रह्मोत्सव सजला असून मंदिरामध्ये आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुजाचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्याजी महाराज यांच्या आशिर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरु आहेत. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा यांसह पूजेचे यजमान विशाल मेहता यावेळी उपस्थित होते.

राजकुमार अग्रवाल म्हणाले, धार्मिक कार्यक्रमांमध्ये होम-हवन, महाअभिषेक, सुवर्ण पुष्पअर्चना तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य वंचित मुलांच्या संस्थेला वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या गाभा-यात देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, मंदिरात केशर दूध अभिषेक, पालखी सोहळा आणि पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हे नाविन्यपूर्ण कार्यक्रम देखील होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य खुले असून पुणेकरांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

