कार्यकर्त्यांनी नवीन कृषी बिलाच्या प्रती जाळल्या!
मुंबई- आम आदमी पार्टीच्या वतीने आज केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आजाद मैदान येथे केलेल्या भव्य मोर्चा मध्ये कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सरकारला विरोध दर्शविला व काळी कृषी विधेयके पाठीमागे घेण्याची जोरदार मागणी केली.
केंद्रातील भाजप सरकारने गेल्या काही दिवसांत संसदेत जुलमी कृषी विधेयके लोकशाहीचा गळा घोटून जबरदस्तीने पास करून घेतली. आम आदमी पक्षाचा आरोप आहे की मोदी सरकारने ही कृषीविषयक बिले औद्योगिक कार्पोरेट घराण्यांना फायदा पोहोचविण्या करिता केलेली असून ही बिले पूर्णतः शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल पहिल्यापासून या विधेयकांच्या संपूर्ण विरोधात होते व त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. सोमवारी दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची त्यानी सदिच्छा भेट देवून आंदोलनाला पूर्णतः पाठिंबा दिला होता. आम आदमी पक्षाच्या या कृतीला घाबरून केंद्र सरकारने मंगळवारी सकाळपासूनच श्री केजरीवाल यांना त्यांच्या दिल्ली निवासस्थानी पोलिसांच्या माध्यमातून बाहेर पडू दिले गेले नसून नजरकैदेत ठेवले.
मुंबईत आझाद मैदान येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संबोधन करताना पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आणि प्रवक्त्या प्रीति शर्मा मेनन म्हणाल्या “केंद्रातील मोदी सरकार ने शेतकरीविरोधी कृषी विधेयके जाणीवपूर्वक पास करून घेतली आहेत परंतु या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नसून फक्त काही औद्योगिक कार्पोरेट घराण्यांना याचा फायदा पोहोचविला जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना शेती करून विशेष आर्थिक दृष्ट्या काहीच फायदा होत नसून आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. आर्थिक संकटामुळे हजारो शेतकरी आत्महत्या करत असून देशाचे पोट भरणारा अन्नदाता सध्या खूप वाईट अवस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये काहीच सुधारणा होत नसून आता या नवीन कृषी विधेयकामुळे त्यांची परीस्थिती भूतो न भविष्यती अशी वाईट होवून स्वतःच्या शेतात ते मजूर म्हणून आणखीन खडतर जीवन जगण्यास परावृत्त होतील अशी आशंका आहे. दिल्ली सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना आतंकवादी संबोधने हा तर आता तर खेदाचाच विषय आहे. शेतकरी आपल्या हक्कांची लढाई लढत असताना त्यांना राष्ट्रविरोधी ठरविणे अन्यायकारक असून त्यांच्या आंदोलनाची उपेक्षा करून बदनाम करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. आम्ही याची तीव्र निंदा करतो व मागणी करतो की हे सर्व काळी कृषी विधेयके सरकारने त्वरित पाठीमागे घ्यावीत.”
या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखविली. पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे, संयुक्त राष्ट्रीय सचिव रुबेन मस्करेनहास, टास्क फोर्स सदस्य मनु पिल्लई, सुमित्रा श्रीवास्तव , महेश दोषी , द्विजेन्द्र तिवारी सहित सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

