मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे. असाच वेगळ्या आशय आणि विषयाच्या ‘Thank U विठ्ठला’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा अभिनेता–दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते उत्साहात नुकताच संपन्न झाला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटातील गाण्याची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. एम.जी.के प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांनी केली असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. येत्या ३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला संदेश देणारा ‘Thank U विठ्ठला’ हा चित्रपट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचं अभिनेता महेश मांजरेकर यांनी याप्रसंगी सांगितलं. मी आणि मकरंद अनासपुरेनी ‘Thank U विठ्ठला’ च्या निमित्ताने बऱ्याच दिवसाने एकत्र काम केलं असून आम्ही जितका हा चित्रपट एन्जॉय केला तितकाच तो प्रेक्षकही एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात पहाता येईल.
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, याकुब सय्यद, अरुण घाडीगावकर, अरुण टकले, संतोष केवडे, मिलिंद साफई, सतीश सलागरे, संग्राम सरदेशमुख, राजेंद्र जाधव, शैलेश पितांबरे, अंतून घोडके, आनंद जोशी, अमीर शेख, मनीषा राऊत, शिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.
चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.
३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रदर्शित होणार आहे.