पुणे. : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम व उत्तोमोत्तम संस्काराचे साधन आहे. शिक्षक हाच आपला खरा गुरु असून त्यांचा आदर केला पाहिजे. उद्याच्या भारताचे भवितव्य घडवण्याचे काम शिक्षक करत असतात असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त कसबा मतदार संघातील शाळांमधील शिक्षकांच्या सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
शिक्षणाचे हे पवित्र कार्य एक व्रत म्हणून आपण करत आहात. उद्याच्या नागरिकांची जडण घडण आपल्या हातून होत आहे. भावी भारताचे स्वप्न साकारताना आपण बालकांशी संवाद साधून त्यांच्याशी समरस होता. नव्या पिढीला आपण सातत्याने प्रयोगशील व उपक्रमशील बनवत आहात. सामाजिक व राष्ट्रीय समस्यांचे प्रतिबींब शैक्षणिक क्षेत्रात घडत असताना आपण आपली दूरदृष्टी, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक संवेदनशीलतेचा उपयोग करून अध्यापन क्षेत्रात मोलाचे योगदान देता. यामुळे आदर्श समाज घडण्यास मदत होते. राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे काम महत्वपूर्ण आहे. वर्षभर ज्ञानदानाचे काम करणार्या शिक्षकांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचे कौतुक करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. शिक्षकी पेशा असणार्या व्यक्तिला राष्ट्रपती पद बहाल करून त्यांचा गौरव करणे, भारता सारख्या देशातच शक्य आहे असेही श्री बापट भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी बोलताना म्हणाले.
गेल्या 24 वर्षापासून कसबा मतदार संघातील शाळांच्या शिक्षकांचा सत्कार पालकमंत्री बापट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येतो. यंदा 64 शाळांमधील 3700 शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. श्री बापट यांच्या हस्ते के.सी संघवी प्रशाला, सेंट हेल्डाज, जेधे महाविद्यालय येथील शिक्षकांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
सत्काराच्या निमित्ताने या कार्यक्रमाला कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेश येणपुरे, नगरसेवक अशोक येणपुरे, विष्णू हरिहर, बापू नाईक, नामदेव माळ्वदे, राजू परदेशी, वैशाली नाईक मदिना तांबोळी, क्रांती खांडरे, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.