पुणे, दि. ०२ नोव्हेंबर २०२१ : दिवाळी सणाला सुरवात झाली असून सार्वजनिक वीजयंत्रणेपासून तसेच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सतर्क राहून व वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
दरम्यान, दिवाळी सणाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिल्या आहेत.
महावितरणची विजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सतर्क राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. या विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशदिवा लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी. घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

