पिंपरी / प्रतिनिधी:
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन एकसंघ समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालय (एम.एम. कॉलेज), काळेवाडी येथे अच्युत हांगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी हांगे यांनी मराठवाडा शौर्यगाथा कथन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर एम.एम.कॉलेज ते निगडीतील भक्तीशक्ती चौक दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवडस्थित मराठवाड्यातील नागरीक सहभागी झाले होते.
बबनराव लोणीकर म्हणाले, की पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती चांगले काम करीत आहे. सुजीतसिंह ठाकूर यांनी भूमिपुत्रांचे चालू असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे, याला नक्की यश येईल. महापौर नितीन काळजे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सुसज्य मराठवाडा भवन निर्मिती करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अरुण पवार म्हणाले, की पिंपरी-चिंचवड महापालिका व मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने प्रथमच उद्योगनगरीमध्ये मराठवाडा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमामुळे मराठवाड्यातील बांधव एकत्र येण्यास मदत होईल. मराठवाडयातील प्रत्येक बांधवाला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. येथे राहणार्या सुमारे सहा लाख बांधवांचे प्रश्न सोडविणे, त्यांना मुक्त व्यासपीठ मिळावे, आर्थिक, सामाजिक, धार्मिक प्रश्न सुटावेत यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. त्यादृष्टीनेच आतापर्यंत सुमारे सव्वालाख बांधवांची नोंदणी केली आहे. पुढील वर्षभरात दोन लाखाचा टप्पा गाठला जाईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील गुणवंतांचा सन्मान
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मराठवाड्यातील भूमिपूत्र डॉ राघवेंद्र शाईवाले, गोपाळ माळेकर, राजेंद्र हुंजे, विश्वंभर चौधरी, शिवाजीराव जाधव, बापूसाहेब गायकवाड, गिरीधर काळे, रमेश जाधव, शारदा मुंढे, राम सातपुते यांचा ‘मराठवाडा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला. तसेच मूळची मराठवाड्याची असणारी गायिका कार्तिकी गायकवाड विविध गीते सादर करीत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. संगीत रसिकांनीही या गाण्यांना उत्स्फूर्त दाद दिली.