पुणे- : ‘पुणे फेस्टिवल’ आणि ड्रीम गर्ल हेमामालिनी हे एक समीकरण होते. या फेस्टिवलचे उद्घाटन अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार होते. पण हेमामालिनी पुण्यात असल्याने त्यांनाही उद्घाटनाला निमंत्रित केले. त्या नऊवारी साडी परिधान करून आल्या खऱ्या; मात्र, त्यांच्या साडीला ‘मॅचींग’ ब्लाऊज अवघ्या तीन तासात कसा शिवून आणला गेला, याचा किस्सा डॉ. सतिश देसाई सांगताच विद्यार्थी, पालक अक्षरश: हास्यकल्लोळात बुडून गेले. निमित्त होते, मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेेचे.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्यावतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेेतील तिसरे पुष्प पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी गुंफले. ‘मी एक आनंदयात्री’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्येष्ठ प्रवचनकार व लेखक डॉ. संजय उपाध्ये, कार्यवाह रामदास काकडे, विलास काळोखे, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मुकुंद खळदे, निरुपा कानिटकर, चंद्रभान खळदे, संदीप काकडे आदी उपस्थित होते.
आपल्या चार दशकांच्या वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीत भेटलेल्या व्यक्तिमत्वांच्या भेटीत आलेले अनुभव व त्यातून मिळालेले धडे डॉ. देसाई आपल्या खास शैलीत उलगडले. ‘मी एक आनंदयात्री’ या कार्यक्रमाचे नाव ‘हेमामालिनीचा ब्लाऊज आणि मी’ असे ठेवणार होतो, अशी आपल्या भाषणाची सुरुवात करताच हास्यकल्लोळ उसळला आणि पाठोपाठ एकामागून एक किस्से सांगत डॉ. देसाई यांनी ब्लाऊजच्या किस्स्याची उत्सुकता वाढवत नेऊन मग तो सविस्तर सांगितला. मंडईमधील शेखर खन्ना या कार्यकर्त्यांचा किस्सा.. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतानाचे किस्से.. मदर तेरेसा यांनी दिलेला आशीर्वाद… सुरेश भटांनी प्यायलेली झणझणीत तर्री..पतंगराव कदम यांच्यासाठी आणलेला फुलांचा हार.. किशोरी आमोणकर यांना कार्यक्रमाचे निमंत्रण… या व्यक्तींसोबत घडलेले किस्से खुमासदार शैलीत डॉ. देसाई यांनी सांगितले.
शरद पवार व प्रतिभाताई पवार यांची पॅरिसमध्ये झालेली अनपेक्षित भेट व आपल्या कॅमेऱ्यात त्यांचे आयफेल टॉवर येथे फोटो काढलेले फोटो आणि नंतर समजले की कॅमेऱ्यात रोलच घातला गेला नव्हता… तसेच सोबत जेवण करताना चिकनचे ताट समोर आले खरे, पण आपण पवारांना नॉनव्हेज खात नसल्याचे सांगताच प्रतिभाताईंनी स्टीमराईस मागवून त्यात प्रतिभाताई यांनी सोबत आणलेले मेतकूट घालून खाल्लेल्या भाताची चव कधीच विसरू शकत नाही, असे सांगितले. अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घरी झालेल्या भेटीत त्यांचा जाणवलेला साधेपणा व इतरांचा आदर कसा करावा, हे अनुभवायला मिळाले. कार्यकर्त्यांना जपायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हे यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकायला मिळाल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.
डॉ. देसाई म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रसंग घडत असतो. एखादा मित्र भेटतो, नातेवाईक भेटतो. असे असंख्य व्यक्ती आपल्याला भेटतात. मात्र, प्रत्येकच व्यक्ती आपल्या लक्षात राहत नाही. आयुष्यामध्ये विविध व्यक्ती येत असतात. चांगली माणसे आयुष्यात आली तर जगण्याचा अर्थ कळतो. आयुष्यातील किस्यांमुळे मी घडत गेलो. वर्षानुवर्षे काम करण्याची क्रेडीबिलिटी मला अनुभवातून अनुभवता आली. आयुष्यात येणार्या लोकांमुळे आपले आयुष्य समृद्ध होत असते. विद्यार्थ्यांनीही दररोज डायरी लिहिण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी, सूत्रसंचालन विजय खेडकर व हर्षदा पाटील यांनी, तर आभार निरुपा कानिटकर यांनी मानले.

