रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद
पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले.
रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे, संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला.
जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे.
विकृत शिवचरित्रे नष्ट करा
सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले.
समारोप समारंभ
भिडे गुरुजी यांच्या...