तालायनतर्फे आयोजन, दिग्गज कलावंताचे सादरीकरण एकाच व्यासपीठावर
पुणे : पद्मविभूषण पं. किशनमहाराज यांचे ९५ वे जयंतीवर्ष तसेच प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार आजाद यांचा ५० वा जन्मदिन असे दुहेरी औचित्य साधून तालायन म्युझिक सर्कलतर्फे ‘उन्मुक्त’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि.२९) बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता ही मैफल पार पडेल.
बनारस शहराला अभिजात शास्त्रीय कलेचा वारसा लाभला असून अनेक दिग्गज कलावंत या शहरातून घडले आहेत.अशा बनारस घराण्याच्या कलेची अनुभूती घेण्याचा दुर्मिळ योग म्हणजे उन्मुक्त मैफल असे म्हणता येईल. गायन, वादन आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम जणू एकाच व्यासपीठावर घडवणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल. कथक सम्राट पं. विशाल कृष्णा यांचा नृत्याविष्काराने या मैफलीस आरंभ होईल. त्यानंतर प्रसिद्ध गायक पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा आपल्या गायकीतून पं किशन महाराज यांना स्वरांजली अर्पण करतील. तर ठुमरी सम्राज्ञी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या सुप्रसिद्ध गायिका पद्मविभूषण गिरीजादेवी यांच्या सुमधुर स्वरांजलीने कार्यक्रमाची सांगता होईल.
प्रसिद्ध तबलावादक पं अरविंदकुमार आझाद यांच्या साथीने कार्यक्रमाची रंगत वाढेल. तर पं. धरमनाथ मिश्रा आणि देवेंद्र देशपांडे (संवादिनी), पं. संतोष मिश्रा (सारंगी), रोहित वनकर (बासरी), सुरंजन खंडांळकर (गायन) यांसारखे नामवंत कलाकार साथसंगत करतील. सूर ताल आणि पदन्यास यांच्या सुरेल मिलाफ साधणारी ‘उन्मुक्त’ मैफल रसिक पुणेकरांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.