
पशुपालकांच्या कल्याणासाठी चराऊ कुरणे मुक्त करा – स्वर्ण भारत पक्षाची मागणी
पुणे- महाराष्ट्रातील चरावू कुरणांवर राजकीय हितसंबंधी आणि गांवगुंडांच्या अतिक्रमणामुळे चराऊ कुरणे आक्रसत चालली असून चराईसाठी कुरणांवर अवलंबून असलेल्या धनगर, गोपाळ व अल्पभुधारक शेतक-यांच्या अस्तित्वावरच घाला आला आहे. त्यामुळे या समाजांवरील बेकारीचे संकट गहिरे झाले असून यामुळे कदाचित भविष्यात पशुपालनाचा व्यवसायच संपुष्टात येण्याची भिती आहे. यामुळे निर्माण झालेला पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर आहे. सरकारने तत्काळ या प्रश्नात लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे एकुण शेतजमीनीच्या किमान ५% एवढे क्षेत्र चराऊ कुरणे/गायराने यासाठी मुक्त करावे. यासाठी या कुरणांवर झालेली अतिक्रमणे, कितीही मोठी असली तरी उध्वस्त करावीत आंणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बूज राखावी अशी मागणी स्वर्ण भारत पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी केली. या प्रसंगी महाराष्ट्राचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मृणाल ढोलेपाटीलही उपस्थित होते.
सोनवणी म्हणाले कि पशुपालन हा जगातील प्राचीन व्यवसाय आहे. आजही भारतात अनेक समाज निमभटक्या पशुपालनावरच आपला चरितार्थ चालवतात. स्वातंत्र्य मिळतांना भारतात ७ कोटी हेक्टर एवढी चराऊ कुरणे उपलब्ध होती. आता ती घटत अडीच कोटी हेक्टरपर्यंत आक्रसली आहेत. महाराष्ट्रात तर केवळ १.८% एवढेच क्षेत्र चराईसाठी उपलब्ध आहे. चा-याच्या कमतरतेमुळे शेळ्या-मेंढ्या व अन्य जनावरांना अर्धपोटी रहावे लागते. शेतपीकांच्या बदलत्या स्वरुपामुळे तेथुनही पुरेसा चारा उपलब्ध होत नाही. आपल्या शेळ्या-मेंढ्यांच्या व जनावरांच्या पोटभराईसाठी धनगर-गवळ्यांना आता तीन-चारशे किलोमीटरच्या पायपीट्या कराव्या लागतात. ही स्थिती दुर्दैवी आहे.
चराऊ कुरणांच्या जागा औद्योगिक वसाहती, खाजगी महाविद्यालये, सहकारी संस्था यांनी जशा बळकावल्या तशाच त्या अनेक बेकायदेशीर अतिक्रमणांमुळेही आक्रसल्या. वनखात्याने अनेक जाचक निर्बंध लादल्याने वनक्षेत्रातही चराई करणे अशक्य झाले आहे. चा-यासाठी कुरणांवर भरघोस येणा-या गवताच्या प्रजाती शोधत त्याचा प्रसार करण्यास कृषी महाविद्यालये अपेशी ठरलीत. उलट चराऊ कुरणांवर अभारतीय वनस्पतींची वनीकरणा-च्या नांवाखाली केलेली लागवड आहे त्या कुरणांचीही दुर्दशा करत आहे.
भारत पशुसंख्येत अग्रणी देश असून राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा वाटा ४% आहे. जवळपास दहा कोटी मेंढपाळ-गोपाळ व अल्पभुधारक चा-यासाठी कुरणांवरच अवलंबून आहेत. या क्षेत्रात आर्थिक विकासाची मोठी संधी असून त्यासाठी सुयोग्य धोरणाची गरज आहे. आज वाढत्या बेरोजगारीवर हा एक उतारा आहे पण उलट कुरणे घटत असल्याने पशुपालकच बेरोजगार होत आहेत. त्यावर उपाय म्हणून कुरणांचा विकास, संरक्षण व संवर्धन यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचेही संजय सोनवणी म्हणाले.