पुणे : सलग १२ तासांच्या स्वरयज्ञात सतार, व्हायोलिन, तबला, हामोर्नियमन, सिन्थेसायझर, गिटार, माऊथ आॅर्गन, अॅकॉर्डियन, बासरी तर काही कलाकारांनी शिळ वादनातून, चित्रांतून गानसम्राज्ञी लतादीदींना श्रध्दांजली अर्पण केली. आपल्या स्वरांनी फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मोहित करणाºया लतादीदींना पुणेकरांनी स्वरांच्या मैफलीतून अखेरचा दंडवत दिला. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्यावतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यासाठी सलग १२ तासांच्या स्वरयज्ञाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म.जोशी, माजी आमदार उल्हासदादा पवार, निवेदक सुधीर गाडगीळ, गायक उपेंद्र भट, गायिका मंजुषा पाटील, ज्येष्ठ समिक्षीका सुलभा तेरणीकर, शिरीष रायरीकर, लेखक राजन लाखे, पीएनजी सन्सचे अजित गाडगीळ, रेणू गाडगाळ यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. या स्वरयज्ञात दिवसभरात तब्बल शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमाळकर यांनी देखील स्वरयज्ञ कार्यक्रमाला भेट देऊन लतादीदींना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरूवात व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे, सिंथेसायजर विवेक परांजपे, बासरी वादक निलेश देशपांडे, तबलावादक राजेंद्र दुरकर, गायिका मनिषा निश्चल यांच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर कलाकारांनी दीदींच्या भावगीत, बालगीत, शृंगारगीत, प्रेमगीत, देशभक्तीपर गीतांची स्वरमाळ गुंफली. त्याचबरोबर हेमंत गद्रे यांनी माऊथआॅर्गन मधून तर अनिल गोडे यांनी अॅकॉर्डियन वादनातून दीदींच्या अनेक अपरिचत गाण्यांनी उजाळा दिला. नगरचे शिल्पचित्रकार प्रमोद कांबळे यांनी चार चित्रे रेखाटली, तर इक्बाल दरबार यांनी सेस्कोफोनवर आणि स्वाती जोशी यांनी माऊथ आॅर्गनद्वारे सादरीकरण करीत स्वरांजली अर्पण केली.
किशोर सरपोतदार म्हणाले, मंगेशकर घराण्याचे आणि सरपोतदार घराण्याचे जवळचे संबंध आहेत. लहान असताना मास्टर दिनानाथ मंगशेकरांबरोबर लतादीदी पूना गेस्ट हाऊसमध्ये येत असत. त्यावेळी तेरा वर्षांच्या असताना त्यांनी पूना गेस्ट हाऊस मध्ये गायन केले होते. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी या स्वरयज्ञाचे आयोजन केले असून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले असल्याचे त्यांनी सांगितले. मनिष गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम केले.
सलग बारा तासांच्या स्वरयज्ञातून कलाकारांची लतादीदींना स्वरांजली
Date:

