अनेक व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर
मुंबई दि ४ जुलै : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नैराश्यातून समाजातील विविध व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आतातरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात अशी आर्त हाक विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिली आहे. या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे असा आरोपही दरेकर यांनी केला.
पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले अशी टिका दरेकर यांनी केली.
कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन परीक्षा व नोकरीसाठी तात्काळ उपाय योजना व अंमलबजावणी करा, अशी मागणी दरेकर यांनी केली


