मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश न पाळणाऱ्या बंडखोर ३९ आमदारांविरोधात शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे निलंबन याचिका दाखल केली आहे. पक्षाने व्हीप बजावूनही ३९ आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं आहे. त्यासंबंधीचं व्हिडीओ रेकॉर्ड उपलब्ध आहे. सदरील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
शिंदे गटानेही व्हीप काढला आहे. त्यांनीही शिवसेनेच्या उर्वरित १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, या प्रश्नावर उत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले, “शिंदे गटाचं अस्तित्व काय, त्यांना मान्यता आहे का? शिवसेना रजिस्टर पक्ष आहे, पक्षाला मान्यता आहे. दोन तृतीयांश आमदार असल्याचं सांगून भ्रम निर्माण केला जात आहे. विधिमंडळ कार्यालयाच्या चाव्या शिंदे गटाकडे असल्याच्या बातम्या चुकीच्या, उद्या कार्यालय उघडेल, असंही खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं.

