पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. (प्रा.) संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रसिद्ध हास्यकलावंत सुनील ग्रोव्हर उर्फ डॉ. मशहूर गुलाटी उर्फ गुथ्थी उर्फ रिंकू भाभी यांचा हिंदी रजतपटावरील मनोरंजन क्षेत्रातील उत्कृष्टतेबद्दल डॉ. गुलाटीज कॉमेडी शो या कार्यक्रमात ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड-२०१७’ हा पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
सुनील ग्रोव्हर हे सध्याच्या अत्यंत कुशल स्टँड-अप कॉमेडियनपैकी आहेत. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात त्यांनी साकारलेल्या गुथ्थी या प्रसिद्ध व्यक्तीरेखेप्रमाणेच डॉ. मशहूर गुलाटी, रिंकू भाभी अशा व्यक्तीरेखा या कार्यक्रमाच्या यश आणि प्रसिद्धीस कारणीभूत ठरल्या. केवळ इतकेच नव्हे, तर सुनील हे एक बहूपैलू अभिनेतेही आहेत. अक्षय कुमारच्या गब्बर चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय खरोखर प्रशंसनीय ठरला.
सुनील ग्रोव्हर यांना पुरस्कार देऊन गौरवण्याच्या प्रसंगी लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन, गायक, अभिनेते व नकलाकार नवीन प्रभाकर उपस्थित होते. नवीन प्रभाकर हे ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज कार्यक्रमाचा भाग आहेत. पेहचान कौन कार्यक्रमातील त्यांच्या व्यक्तीरेखेमुळे ते प्रसिद्ध आहेत. यावेळीही त्यांनी ती व्यक्तीरेखा सादर करुन प्रेक्षकांना रिझवले. नवीन प्रभाकर यांचाही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सौ. सुषमा चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सुनील ग्रोव्हर प्रेक्षकांसमोर रिंकू भाभी, डॉ. मशहूर गुलाटी व गुथ्थीच्या भूमिकेत अवतरले. त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला, त्यांना रंगमंचावर पाचारण केले, त्यांच्यासमवेत खेळ खेळले आणि उपस्थितांपैकी प्रत्येकाला विनोदाने खळखळून हसवले.
पुरस्कार स्वीकारताना सुनील ग्रोव्हर म्हणाले, “मी नेहमीच माझ्या कामाचा पाठपुरावा केला. त्यातूनच मला समृद्धी आणि यश मिळाले आणि हे सर्व मी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर साध्य केले. प्रतिष्ठित सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड्स देऊन माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी या समूहाचा आणि माझ्या सहकारी संघाचा अत्यंत आभारी आहे.”
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “सुनील ग्रोव्हर यांच्याखेरीज कोणताही विनोदी कार्यक्रम परिपूर्ण होऊ शकत नाही. ते सध्याच्या काळातील अत्यंत लोकप्रिय व बहूपैलू हास्यकलावंत आणि अभिनेते आहेत.” डॉ. चोरडिया यांनी सुनील ग्रोव्हर व नवीन प्रभाकर या दोघांनाही भविष्यातील त्यांच्या कार्यक्रमांसाठी व चित्रपटांसाठी शुभेच्छा दिल्या.
विवीध क्षेत्रांतील दोन हजारांहून अधिक व्यक्ती, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’मधील २०० हून अधिक विद्यार्थी, कर्मचारीवर्ग यांनी या विनोदी कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद लुटला. सुनील ग्रोव्हर आणि नवीन प्रभाकर यांच्या डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी शोसाठी ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट’च्या (एसआयएमसीईएम) विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारीवर्गाने साह्य केले.
‘एसआयएमसीईएम’चे विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंटचे शिक्षण केवळ वर्गात आणि पाठ्यपुस्तकांतून घेत नाहीत, तर त्यांच्या कल्याणकारी विकासासाठी, तसेच उद्योगसज्ज व्यावसायिक बनण्यासाठी प्रात्यक्षिक अनुभव घेण्याच्या हेतूने सातत्याने विविध कार्यक्रमांत सहभागी होतात.
डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी शो एक्सेल अफेअर्स, डॉ. आलोक मिश्रा व रोहित सिंग यांनी प्रायोजित केला होता. कार्यक्रमाला युद्धात शारीरिक अपंगत्व आलेले सैनिक, हुतात्मा सैनिकांच्या विधवा, अनाथाश्रमांतील विशेष बालके व ममता फाऊंडेशनने आधार दिलेले एचआयव्ही+ रुग्ण विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाला सुमीत ग्रुप, नांदेड सिटी व सिस्का एलईडीचे श्री. कृष्ण कुमार गोयल, श्री. अमित साळुंखे, श्री. सुमीत साळुंखे व श्री. प्रभाकर साळुंखे यांचेही प्रायोजकत्व लाभले.
‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’तर्फे भारत व परदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींना त्यांनी संबंधित क्षेत्रांत व विवीध श्रेणींत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन सन्मान करण्याच्या हेतूने ‘सूर्यदत्ता लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड्स’ व ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड्स’ हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.