पुणे-‘सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशन’चे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रा. संजयजी चोरडिया व उपाध्यक्ष तथा सचिव सौ. सुषमाजी चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार २०१७’ सोहळा पुण्यातील महावीर प्रतिष्ठान येथे संपन्न झाला. याप्रसंगी श्री. दीपचंदजी पारख व सौ. सुदर्शनाजी पारख यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘अँटी इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंट’चे (एआयएटीएफ) अध्यक्ष श्री. एम. एस. बिट्टाजी यांच्या हस्ते ‘बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार २०१७’ देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व पुण्यातील विपश्यना सेंटरचे अध्यक्ष डॉ. दत्ता कोहीनकर यांनी प्रेक्षकांना जीवनावश्यक मूल्यांबाबत मार्गदर्शन केले आणि पूर्वजांनी जपलेल्या संस्कारांचे अवलोकन करण्याची विनंती केली.
श्री. दीपचंदजी पारख नामवंत उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि आदर्श व्यक्तीमत्व ही त्यांची अजुन एक ओळख आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीचा प्रवास खेडेगावातील एका लहानशा किराणा माल दुकानापासून सुरु केला आणि आज ते देशातील नावाजलेल्या उद्योजकांपैकी एक आहेत. प्रामाणिकपणा, ग्राहकांचे समाधान होईपर्यंत सेवा देण्याचा सकारात्मक दृष्टीकोन दूरदृष्टी, सामाजिक संवेदनशीलता आदी गुणांच्या जोरावर त्यांनी उद्योजकतेच्या वाटेवरील प्रवास सफल करुन दाखवला.
दीपचंदजींना संसारात तितकीच समर्थ साथ पत्नी सौ. सुदर्शनाजी पारख यांनी दिली. सौ. सुदर्शनाजींच्या आदर्श तत्त्वांची प्रतिमा दीपचंदजींच्या जीवनातही जाणवल्यावाचून राहात नाही. अतिशय निःस्वार्थी व प्रेमळ साथ सौ. सुदर्शनाजी यांनी केवळ दीपचंदजींनाच नव्हे, तर संपूर्ण कुटूंबाला दिली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना दीपचंदजी पारख म्हणाले, “नामवंत शिक्षण संस्थेकडून मला मिळालेला हा पहिला पुरस्कार आहे. मी डॉ. संजयजी चोरडिया व त्यांच्या कुटूंबियांचे आभार मानतो आणि आपणा सर्वांचा ऋणी राहून यापुढेही समाजसेवेत सतत कार्यरत राहण्याची ग्वाही देतो.”
दीपचंदजी व सौ. सुदर्शनाजी यांच्या स्नुषा सौ. राजश्री पारख यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करुन उभयतांबद्दलचे प्रेम, आदर, प्रेरणा व जिव्हाळा व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ. प्रा. संजयजी चोरडिया म्हणाले, “कै. श्री. बन्सीलालजी चोरडिया आणि कै. सौ. रतनबाईजी चोरडिया यांनी पालक म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यात प्रेरणा जागृत केली. माझे वडील अतिशय शिस्तप्रिय, सामाजिक जाणीव असलेले, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व आदर्श पिता होते. आई-वडिलांच्या आठवणीप्रीत्यर्थ व त्यांना आदरांजली म्हणून दरवर्षी आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्याचे आम्ही ठरवले. या पुरस्काराच्या माध्यमातून गौरवलेल्या आदर्श माता-पित्यांमध्ये मी माझ्या आई-वडिलांची प्रतिमा बघतो.”
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील व्यक्ती, शिक्षण, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, पुरस्कारार्थींचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

