पुणे : ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’मधील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी तपस्विनी शर्मा हिला अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’तर्फे (नासा) सेंट लुई येथे होणाऱ्या ३६ व्या वार्षिक ‘इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स’मध्ये (आयएसडीसी) सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तेजस्विनी लवकरच ‘आयएसडीसी’ परिषदेत सहभागी होऊन तेथे स्पर्धकांसाठी आखलेल्या विशेष उपक्रमांना उपस्थित राहील.
तपस्विनीने अलिकडेच झालेल्या ‘नासा स्पेस सेटलमेंट डिझाईन कॉन्टेस्ट-२०१७’ या स्पर्धेत वैयक्तिक श्रेणीत भाग घेतला होता. स्पर्धेत जगभरातून सादर झालेल्या ६००० हून अधिक प्रकल्पांत तपस्विनीच्या ‘किरीथ्रा ऑर्बिस’ या प्रकल्पाला ‘ऑनरेबल मेन्शन ॲवॉर्ड’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. या वार्षिक स्पर्धेचे आयोजन ‘नासा ॲमेस रिसर्च सेंटर’, ‘सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटी’ आणि ‘नॅशनल स्पेस सोसायटी’ (एनएसएस) या संस्थांनी संयुक्तपणे जागतिक पातळीवर विविध गटांत केले होते.
तपस्विनीने शाळेचा पाठिंबा व प्रोत्साहनाच्या बळावर ‘किरीथ्रा’ ही अंतराळातील वसाहतीची रचना विकसित केली. या अंतराळयानवजा वसाहतीचा आकार मधमाशीच्या पोळ्यासारखा आहे. मानवाला अंतराळात आणखी खोलवर संचारास मदत व्हावी, हा या वसाहतीचा उद्देश आहे. हे अंतराळयान हजारो लोकांना नागरिक म्हणून सामावून घेऊ शकते. त्याची विशिष्ट रचनाच त्याला अधिक कार्यक्षम बनवते आणि कमीतकमी जागेत जास्तीत जास्त लोक राहू शकतात. ही अंतराळ वसाहत मानवी अस्तित्वासाठी गरजेची असणारी मूलभूत आणि गुंतागुंतीची कामे करण्यासाठी केवळ उर्जेचे पर्यायी स्रोत वापरते. आर्थिक स्थैयासह अंतराळ शोधमोहीम राबवण्यासाठी ही रचना करण्यात आली आहे.
या उज्ज्वल कामगिरीबद्दल ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या सचिव व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी तिचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की देशातील चारही भौगोलिक विभागांत अधिक अंतराळकेंद्रे उभारली जाणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना या केंद्रांना भेट देण्याची संधी मिळाल्यास एरोनॉटिक्स विषयात करिअर करण्याबाबत त्यांच्यात जाणीव निर्माण होईल.
‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’ ही शाळा आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन थांबत नाही, तर त्यांना कल्पक व बहुपैलू विचार करण्यासही प्रोत्साहन देते. येथील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा स्पर्धांमध्ये नियमित सहभागी होतात. तेजस्विनीचे यश तिच्यासाठी आणि शाळेसाठी खरोखर अभिमानाचा क्षण आहे.