लोकशाही पूरक मानसिकता घडविण्याचे कार्य माध्यमांनी करावे –रामराजे
पुणे—आजची लोकशाही ही चांगली आहे. त्या लोकशाहीला पूरक मानसिकता घडविण्यासाठी समाज
सुधारणेचे काम माध्यमांनी करावे असे आवाहन विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिनाच्या निमित्ताने
आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये नगरसेवक सनी निम्हण यांना कार्यक्षम नगरसेवक पुरस्काराने
गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, संघाचे राज्य संघटक
संजय भोकरे, संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद घोळवे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे, विजय वर्पे, पत्रकार संघाचे सरचिटणीस
विश्वास आरोटे, राकेश टोळ्ये, शहराध्यक्ष विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले, अठरा पगड जाती व्यवस्थेपासून आपली लोकशाही सक्षम आहे. मात्र, ती भविष्यातही
सक्षम राहण्यासाठी समाज सुधारणेचे काम माध्यमांना सकारात्मक भूमिकेतून करावे लागेल.
प्रसारमाध्यमांकडून काही वेळा समाजातील कुणाच्यातरी भावना दुखावल्या जातात. मात्र, एखादी गोष्ट
कोणावर लादणे योग्य नाही. सध्या कायद्याची, न्यायालयाची कोणालाच भीती वाटेनाशी झाली आहे. तुरुंगात
गेल्यावर निवडून येतो अशी मानसिकता झाली असून ते एक चक्रव्यूह झाले आहे. मात्र या चक्रव्यूहात पुढची
पिढी अडकण्याअगोदर सर्वानी सावरले पाहिजे. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांबरोबरच
लोकशाहीच्या सर्व स्तंभांची आहे असे त्यांनी नमूद केले.
सध्या धर्म-अधर्म हा विषय संवेदनशील झाला आहे. माझा तोच धर्म आणि दुसऱ्याचा तो अधर्म ही मानसिकता
वाढीस लागली आहे. माझा तोच धर्म आणि दुसऱ्याचा तो अधर्म असे कोणी म्हणत असेल तर तोही एक अधर्मच
आहे असे सांगून निंबाळकर म्हणाले, हिंदू धर्माला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे. सर्व धर्मांबद्दलची सहिष्णुता
जपली गेली तर वाद होणारच नाहीत.
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी वर्तमान वर्तमान पत्रांमध्ये गुन्हेगारी बातम्यांचे प्रमाण वाढले असून त्याचा
परिणाम तरुण पिढीवर होत असल्याचे मत व्यक्त केले. त्यातून तरुणांच्या मनामध्ये समाजाबद्दलची नकारात्मक
मानसिकता निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
दिलीप कांबळे, गोविंद घोळवे, संजय भोकरे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्यात अभिनेते मकरंद अनासपुरे व मृणाल कुलकर्णी यांना कलारत्न, प्रकाश म्हात्रे यांना धर्मरत्न, अमोल
बराटे यांना क्रीडारत्न, नितीन टिळेकर यांना कृषिरत्न, संतोष कस्पटे व अंकुश आसबे यांना उद्योगरत्न, जय
जाधव, संदेश शिर्के व गीतांजली शिर्के यांना कार्यक्षम अधिकारी, शैलेश मोहिते पाटील यांना युवारत्न, आरती
बाबर यांना कार्यक्षम नगरसेवक व अशोक मुनोत व विजय मोरे यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच बाबा शेख, संतोष शाळीग्राम, भूपाल पंडित, राहुल शिंदे, बापू बैलकर, अजित चव्हाण, योगेश बोरसे, संतोष शाळीग्राम, सागर आव्हाड,
मनोज गायकवाड, अश्विनी जाधव यांना कार्यक्षम पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.