पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सुपर प्लेऑफ सामन्यांत पिंपरी चिंचवड विभागाने बाजी मारली. मुलींच्या गटात ज्ञान प्रबोधिनी क्रीडा संस्था तर मुलांच्या गटात आदिनाथ कबड्डी संघ यांनी स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
शारदा विद्या मंदिर, बारामती येथे पार पडलेल्या सुपर प्लेऑफ सामन्यांच्या अंतिम फेरीत मुलींच्या गटात पिंपरी चिंचवड विभागाच्या ज्ञान प्रबोधिनी क्रीडा संस्था संघाने पुणे विभागाच्या एम.एच स्पोर्टस् संघाचा 22-14 असा पराभव करत विजेतेपद राखले. ज्ञान प्रबोधीनी क्रीडा संस्था संघाकडून संजना पोळने 11, प्रियांका सोनावणेने 6 तर रुनाली जाधवने 5 गुण मिळवत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
मुलांच्या गटातही पिंपरी चिंचवड विभागाने बाजी मारली आदिनाथ कबड्डी संघाने पुणे विभागाच्या उत्कर्ष क्रीडा संस्था संघाचा 18-14 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. आदिनाथ कबड्डी संघाच्या चांदसाब बांगीने 8, आकाश बर्गेने 6 तर शिवम पवारने 4 गुण मुळवून संघाला विजय मिळवून दिला.