पुणे ः पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील मलेशियन रॅलीत दुसरा आणि आशिया करंडक गटात चौथा व एकुण क्रमवारीत सहावा क्रमांक मिळविला. पहिल्या दिवशी केवळ दोन किलोमीटर बाकी असताना कार भरकटल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी रीस्टार्ट करीत रॅली पूर्ण केली.
मलेशियातील जोहोर बारू प्रांतात ही रॅली शनिवारी-रविवारी पार पडली. संजयने एम्पार्ट या नव्या संघाचे प्रतिनिधीत्व केले. जपानची नोरीको ताकेशिता त्याची नॅव्हीगेटर होती. संजयने मित्सुबिशी मिराज आर 5 ही जास्त वेगवान आणि शक्तीशाली कार चालविली. टेस्टींग आणि सरावाशिवाय त्याला रॅली सुरु करावी लागली. शुक्रावारी सकाळी त्याला शेकडाऊनमध्येही भाग घेता आला नव्हता.
शनिवारी संजयची कार सातव्या स्टेजमध्ये उजव्या वळणावर भरकटली. वेगामुळे टायरची आतील बाजूची ग्रीप कमी झाली. त्यातून सावरण्याच्या प्रयत्नात बाजूला खणलेल्या जागेत दोन्ही चाके गेली. ही जागा खोल असल्यामुळे संजयला कार बाहेर काढता आला नाही. पहिल्या दिवसातील ही शेवटची स्टेज होती. ती संपण्यास केवळ दोन किलोमीटर बाकी असताना हे घडले. त्यामुळे संजयला सुपर रॅलीमध्ये भाग घ्यावा लागला. त्याला रीस्टार्ट करावे लागले. अखेरच्या स्पर्धकाच्या पेनल्टीमध्ये एका तासाची भार घालून त्याला तसे करण्याची परवानगी मिळाली. शेवटची स्टेज पूर्ण न केलेल्या स्पर्धकाला अशी पेनल्टी बसते. त्यावेळी संजय मलेशियन रॅलीत चौथा, तर एपीआरसीमध्ये सहावा होता. रविवारी दुसऱ्या दिवशी त्याने सहावा क्रमांक कायम राखला, तर मलेशियन रॅलीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली.
गेली काही वर्षे एपीआरसी पातळीवर पूर्ण मालिकेत सहभागी होणाऱ्या संजयने या मोसमात पॅसिफीक विभागातील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथील फेऱ्यांत भाग घेतला नाही. गेल्या मोसमापर्यंत तो जपानच्या कुस्को रेसिंग संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. यंदा त्याने एम्पार्ट संघाशी करार केला. त्याने मित्सुबिशी मिराज आर 5 ही नवी कार खरेदी केली. त्यादृष्टिने पूर्वतयारीवर भर देण्याकरीता त्याने केवळ आशिया करंडक फेरीमध्येच भाग घेतला आहे. त्याला सात बोनस व 12 असे एकूण 19 गुण मिळाले. या गटात तो चौथ्या स्थानावर आहे.
वेगवान कार चालविण्याविषयी संजय म्हणाला की, ही कार चालविण्याचा अनुभव विलक्षण होता. इतकी वेगवान कार मी कारकिर्दीत पहिल्यांदाच चालविली. कार रॅलीच्या आदल्यादिवशीच स्वीडनहून मलेशियात आणण्यात आली. त्यामुळे टेस्टींग करता आले नव्हते, तसेच सरावही होऊ शकला नाही.
ही रॅली अत्यंत खडतर असल्याची प्रतिक्रिया विजेत्या ओले ख्रिस्तीयन याने व्यक्त केली. संजयचा सहकारी यारी केटोमा याने माँटे कार्लोपेक्षा या रॅलीचा मार्ग निसरडा असल्याचे मत व्यक्त केले. अशा परिस्थितीत इतकी वेगवान कार चालविण्याचे आव्हान पेलावे लागले. या कारची क्षमता जास्त आहे.
आधीच्या सुबारू इम्प्रेझा कारच्या तुलनेत तीन पट जास्त वेगाने आम्ही पुढील वळणावर येतो. साहजिकच कार चालविताना जास्त एकाग्रता साधावी लागते. मुख्य म्हणजे त्यासाठी वेगाने विचार करावा लागतो आणि निर्णयही तसाच घ्यावा लागतो. दुसरीकडे नॅव्हीगेटरला सुद्धा जास्त वेगाने पेस नोट्स वाचाव्या लागतात. मला त्याचे आकलन करून तशी कार चालवावी लागते. इतकी वेगवान कार चालविणे अनोखे तसेच काहीसे दडपण आणणारे सुद्धा आहे. त्यासाठी धाडसाने धोका पत्करावा लागतो. मी आणखी सराव करून अशी वेगवान कार चालविण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल.
ही रॅली एमआरएफ संघाच्या ओले ख्रिस्तीयन व्हिबे याने जिंकली. त्याचा भारतीय सहकारी गौरव गील दुसरा आला.
यानंतरची फेरी 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान जपानमध्ये होईल. मालिकेची सांगता 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतात होईल.

