पुणे-भारताने नुकतेच 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे अत्यंत यशस्वीरित्या आयोजन करून दाखवलं आहे. त्याच धर्तीवर टेनिस मध्येही जागतिक दर्जाच्या स्पर्धा बालेवाडी येथे आयोजित अधिकाधिक करण्याचा आमचा भविष्यात प्रयत्न राहील, अशी घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केली.
आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित 25000 डॉलर पुणे ओपन महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेचे उदघाटन राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, धनंजय दामले, पीएमडीटीएचे उमेश माने, जयंत पवार, संदीप कीर्तने, स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, सुपरवायझर शितल अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
तावडे पुढे म्हणाले कि, आता आम्ही टोकियो ओलंपिक च्या दृष्टीने एक कार्यक्रम निश्चित केला आहे. त्याचप्रमाणे पुढच्या 4 वर्षांसाठी आम्ही ओलंपिकच्या दृष्टीने सुनिश्चित कार्यक्रम तयार केला आहे. सुंदर अय्यर यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातल्या लॉन टेनिसच्या विकासासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची यानिमित्ताने आम्हांला संधी मिळाली आहे. या स्पर्धेत अनेक देशांतील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भाग घेतला आहे. या सर्वांचे कौशल्य पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. तसेच सुनील केंद्रेकर यांच्या सहकार्याने येथील टेनिस संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी आम्ही एमएसएलटीला सहकार्य करू असे मी आश्वासन देतो.