- मुलांच्या गटात एकेरीत तानपात निरुद्रोणने, तर दुहेरीत ऋषील खोसला यांना विजेतेपद
पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात जपानच्या सारा साईतो हिने एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात एकेरीत थायलंडच्या तानापत निरूद्रोण याने एकेरीचे विजेतेपद पटकावले.
एकेरीत मुलींच्या गटात जपानच्या तिसऱ्या मानांकित साईतो हिने भारताच्या वैष्णवी आडकरचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 55 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये वैष्णवीने सुरेख सुरुवात करत साराची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-0 अशी आघाडी घेतली. पण पिछाडीवर असलेल्या साराने जोरदार कमबॅक करत पाचव्या व नवव्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये साराने आपला खेळ उंचावत आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर हा 7-6(4) असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये साराने आक्रमक खेळ करत वैष्णवीला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये साराने दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा सहज जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सारा ही अरातो ज्युनियर हायस्कूलमध्ये अकरावी इयत्तेत शिकत असून मॅट टेनिस अकादमीत प्रशिक्षक हायतो मतसुदा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
विजेतेपदानंतर सारा म्हणाली की, वैष्णवी ही उत्कुष्ट खेळाडू आहे. सामन्यात सुरुवातीला मला लय मिळाली नाही व त्यामुळे पहिल्या सेटमध्ये 0-4 फरकाने मी पिछाडीवर होते. पण पुढच्याच गेमला मी वैष्णवीची सर्व्हिस रोखली व बॅकहँड आणि फोरहँडचा सुरेख संगम साधत सामन्यात पुनरागमन केले. पुण्यात ही स्पर्धा खेळून मला आनंद झाला आहे. तसेच, एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना तर्फे पुरविण्यात आलेल्या सर्व सुविधा उत्तम होत्या.
वैष्णवी यावेळी म्हणाली की, गेले तीन आठवडे सातत्याने 22 सामने खेळले असून तसेच काल सलग तीन सामने खेळल्यामुळे माझी दमछाक झाली होती. त्यामुळे तंदरुस्तीचा अभाव आजच्या सामन्यावर जाणवला.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित थायलंडच्या तानापत निरूद्रोण याने कोरियाच्या अव्वल मानांकित वोबिन शिनचा 4-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत मुनी अनंत मणी व ऋषील खोसला या भारताच्या जोडीने कझाकस्तानच्या मॅक्स बात्युटेंको व आरतुर खैरदिनोव्हयांचा 4-6, 6-2, 10-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत जपानच्या सारा साईतो हिने तैपैईच्या यु-युन लीच्या साथीत कझाकस्तानच्या आरझुन सेगदिकोव्हा व जपानच्या होनोका उमेदा यांचा 6-4, 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धतील एकेरी गटातील विजेत्या तानापत निरूद्रोणला एमव्ही देव स्मृती करंडक व 100गुण, तर उपविजेत्या वोबिन शिनला करंडक व 60 गुण देण्यात आले. तर, दुहेरी तील विजेत्या जोडीला करंडक व 75 गुण, उपविजेत्या जोडीला करंडक व 45 गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयकर विभागाचे आयुक्त सुरेश यादव, माजी आशियाई विजेते व डेव्हिस कप खेळाडू संदीप किर्तने, गद्रे मरिनचे सरव्यवस्थापकआश्विन जंगम, एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे सहसचिव गिरीश इनामदार हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव मिहीर केळकर, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुले: तानापत निरूद्रोण(थायलंड)[3] वि.वि.वोबिन शिन(कोरिया)[1] 4-6, 6-2, 6-3;मुली: सारा साईतो(जपान)[3]वि.वि.वैष्णवी आडकर(भारत) 7-6(4), 6-0;
दुहेरी गट: अंतिम फेरी: मुनी अनंत मणी(भारत)/ऋषील खोसला(भारत) वि.वि.मॅक्स बात्युटेंको(कझाकस्तान)/आरतुर खैरदिनोव्ह(कझाकस्तान) 4-6, 6-2, 10-6;मुली: यु-युन ली(तैपैइ)/सारा साईतो(जपान) वि.वि.आरझुन सेगदिकोव्हा(कझाकस्तान)/होनोका उमेदा(जपान) 6-4, 6-1.

