पुणे- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत भारताच्या रामकुमार रामनाथन , पुरव राजा या जोडीने वाईल्डकार्ड प्राप्त जोडी भारताचा लिअँडर पेस व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन यांचा 6-2, 6-1 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत 2 तास 30 मिनिट चाललेल्या सामन्यात 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या झेकियाच्या जिरी वेस्ली याने बेलारूसच्या 25 वर्षीय जागकित क्रमांक152 असलेल्या इल्या इवाश्का याचा 2-6, 6-1, 7-6(11) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिला सेट इल्या इवाश्काने 6-2 असा सहज जिंकत जिरीवर दबाव निर्माण केला मात्र दुस-या सेटमध्ये सुरूवातीपासुनच आक्रमक सुरूवात करत दुसरा सेट 6-1असा सहज जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सेट संघर्षपुर्ण झाला. दोन्ही खेळाडूंना सामन्यातील आपली पकड पक्की ठेवत तिसरा सेट बोराव्या गेमपर्यंत 6-6 असा बरोबरीत राखला व सामना टायब्रेक झाला. टायब्रेकमध्येही दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अतितटीच्या झालेला तीसरा सेट टायब्रेकमध्ये 7-6(11) असा जिंकत जिरी वेस्ली याने 2-6, 6-1, 7-6(11) असा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुस-या उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत लिथुआनियाच्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याने जपानच्या पाचव्या मानांकीत यूची सुगीता याचा 4-6, 7-6(4), 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. पहिला सेट जपानच्या 31 वर्षीय जागतिक क्रमांक 86 असलेल्या पाचव्या मानांकीत यूची सुगीता याने 6-4असा जिंकत सामन्यात आघाडी घतली. दुसरा सेट संघर्षपुर्ण लढतीत लिथुआनियाच्या 29 वर्षीय जागतिक क्रमांक 73 असलेल्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याने टायब्रेकमध्ये 7-6(4) असा जिंकत सामन्यात 1-1 अशी आघाडी घेतली. तिस-या सेटमध्ये रिकार्डस बेरँकीसने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तिसरा सेट 6-2 असा सहज जिंकत सामन्यात 4-6, 7-6(4), 6-2 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.