रोमानीयाच्या जॅकलिन अॅडिना क्रिस्टियन आणि भारताच्या करमान कौरथंडी मानांकित यादीत आघाडीवर
पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटी महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत जागतिक क्र. 265 असलेल्या रोमानीयाच्या जॅकलिन अॅडिना क्रिस्टियनला अग्रमानांकन देण्यात आले आहे. तर भारताच्या करमान कौर थंडीला व्दितीय मानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि.4 ते 11नोव्हेंबर 2017 या कालवधीत होणार असून यामध्ये 15 देशांतील अव्वल खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
इस्राईलची डेनीज खजानीयुक, युक्रेनची व्हॅलेरिया स्ट्राकोव्हा, स्लोव्हाहाकियाची ताडेजा माजेरिक, तैपेईची पीईची ली, रशियाची याना सिझिकोवा आणि एना व्हॅसेलीनोविक हे मानांकित यादीतील अन्य खेळाडू आहेत. गतवर्षी पार पडलेल्या या स्पर्धेत रशियाच्या इरिना क्रोमाचेवाने विजेतेपद पटकावले होते.
या स्पर्धेला कोथरूडच्या आमदार प्राचार्य मेधा कुलकर्णी यांनी पाठिंबा दिला असून भारतीय महिला खेळाडू जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी आपला हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, या स्पर्धेतून बहुमोल असे डब्लूतिए गुण मिळविणे भारतीय महिलांना शक्य होईल आणि त्यामुळे मानांकन यादीतही त्यांना प्रगती करता येईल. करमान कौर थंडी आणि ऋतुजा भोसले या दोन खेळाडू थेट मुख्य ड्रॉमध्ये खेळणार आहेत. परंतु अन्य भारतीय खेळाडूंनाही पात्रात फेरीतून मुख्य ड्रॉ गाठण्याची संधी आहे.
या स्पर्धेचे उदघाटन दि.5 नोव्हेंबर 2017 रोजी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, नवनाथ शेटे संचालित नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमीने या स्पर्धेचे आयोजन केले असून व्यस्त वेळेपत्रकामुळे पुण्याबाहेरच्या स्पर्धा खेळण्यास असमर्थ ठरलेल्या भारतीय महिला खेळाडूंना महत्वपूर्ण गुण मिळविण्यासाठी हि स्पर्धा उपयुक्त ठरेल. आमदार निधीतून या स्पर्धेसाठी साहाय्य केल्याबद्दल मी आमदार मेधा कुलकर्णी यांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारे विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थानिक आमदारांच्या निधीतून विविध स्पर्धांचे आयोजन करणे आम्हांला शक्य होणार आहे.
स्पर्धा संचालक नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमीचे नवनाथ शेटे म्हणाले की, या स्पर्धेत सहभागासाठी गुणवान भारतीय खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे थेट प्रवेश देण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये राष्र्टीय विजेती महेक जैन, उपविजेता झील देसाई, आशियाई जुनिअर विजेती मिहिका यादव आणि पुण्याची स्नेहल माने या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 60डब्लुटीए गुण, उपविजेत्याला 36 डब्लुटीए गुण देण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीतील खेळाडूंना 22 डब्लुटीए गुण, उपांत्यपुर्व फेरीतील खेळाडूला 11 गुण, दुसर्या फेरीतील खेळाडूला 6 गुण आणि पहिल्या फेरीतील खेळाडूला 1 गुण देण्यात येणार असल्याचे शेटे यांनी नमुद केले. आयटीएफ गोल्ड बॅच रेफ्री शितल अय्यर यांची आयटीफ महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने 4 व 5 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीस सोमवार दि.6 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे
जॅकलिन आदींना क्रिस्टियन(रोमानीया), करमान कौर थंडी(भारत), डेनीज खजानीयुक(इस्राईल), व्हॅलेरिया स्ट्राकोव्हा(युक्रेन), ताडेजा माजेरिक(स्लोव्हाहाकिया), पीईची ली(तैपेई),याना सिझिकोवा(रशिया), एना व्हॅसेलीनोविक

