तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेसाठी तिकीट विक्रीला प्रारंभ
पुणे: टेनिस शौकिनांसाठी आणखी एका रोमांचकारी टेनिस मौसमाला प्रारंभ होत असून सर्वांनाच प्रतीक्षा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या सत्राची ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाली असून झुंगा(Zoonga.Com) या अधिकृत ०वेबसाईटवरून आज पासून(बुधवार, 16 जानेवारी) ही तिकीट विक्री सुरु झाली आहे.
दक्षिण आशियातील या एकमेव एटीपी टूर टेनिस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटने(एमएसएलटीए)यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने केले असून पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडीयम येथे येत्या 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेची सिझन तिकिटे खरेदी करणाऱ्या टेनिस शौकिनांना यासाठी आणखी 20 टक्के खास सवलत देण्यात येणार असून या तिकिटात त्यांना सर्व दिवशी सामने पाहता येणार आहेत. स्पर्धेत सर्वात कमी किंमतीचे सिझन तिकीट 1200 रुपये असून 5600 रुपयांपर्यंत ही तिकिटे उपलब्ध आहेत. प्राथमिक फेरीचे एका दिवसाचे सर्वात कमी किंमतीचे तिकिट केवळ 150 रुपये असून सर्वाधिक किंमतीचे तिकीट 750 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, ही तिकिटे ए फ्रंट, ए बॅक, बी-सी फ्रंट, सी बॅक, डी-ई फ्रंट, इ बॅक, एफ फ्रंट, एफ बॅक आणि जी आशा विविध ब्लॉकसाठीच उपलब्ध आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, टेनिस शौकिनांचे आकर्षण असलेल्या पुण्यात प्रचंड प्रतिसाद मिळणाऱ्या टेनिस स्पर्धेचे आयोजन करणे हा आगळा अनुभव असून या स्पर्धेला टेलिव्हिजनवरून ही भरघोस प्रतिसाद मिळतो. तरीही प्रत्यक्ष बालेवाडी स्टेडीयम मध्ये उपस्थित राहून टेनिसचा आनंद लुटणे, हा खूपच वेगळा अनुभव ठरतो आणि बालेवाडीतील उत्तम सुविधांमुळे त्यात बहुमोल भर पडते.
टेनिस शौकिनांसाठी सिझन तिकिटांचे नेहमीच आकर्षण राहिले आहे, असे सांगून सुतार पुढे महणाले की, ऑनलाईन तिकीट विक्रीला जोरदार प्रतिसाद मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. तिकिटाच्या किंमती सर्वांना परवडणाऱ्या अशाच ठेवण्यात आल्या असून सिझन तिकिटांवर अतिरिक्त 20 टक्के सवलत देण्यात आलेली आहे.
टेनिस शौकिनांना उपांत्य आणि अंतिम फेरीचाही थरार पाहण्याची संधी अगदी वाजवी दरातील तिकिटात मिळणार असून उपांत्य फेरीसाठी किमान 250 ते कमाल 1500, तर अंतिम फेरीसाठी किमान 500 ते कमाल 1750 रुपये या श्रेणीत तिकिटे उपलब्ध असणार अआहेत.
खेळाडूंसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या या स्पर्धेत जगातील नामवंत खेळाडूंचा नेहमीच प्रतिसाद लाभला असून यंदाच्या वर्षी फ्रांसचा 24 वा मानांकित बेनॉय पेर, गतवर्षीचा उपविजेता क्रोएशियाचा इव्हो कारलोविच, जर्मनीचा विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी गाठणारा फिलिप कोहेलश्रेबर आणि भारताच्या प्रजनेश गुणनेश्वरण व सुमित नागल या अव्वल खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीचे समाने 1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यासाठी टेनिस शौकिनांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. मुख्य स्पर्धेसाठी टेनिसप्रेमींना https://www.zoonga.com/tata-open या वेबसाईटवर तिकिटे खरेदी कारता येतील.