पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलांच्या गटात शयान राझमी, रयान राझमी, सुमेर मागो, क्रिश गुरबकसानी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलांच्या गटात 21 वर्षाखालील गटांतील राज्यातील अव्वल बिलियर्ड्स खेळाडू रयान राझमी याने आपली विजयी मालिका कायम ठेवत छत्तीसगडच्या रणवीर दुग्गलचा 295-174 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 14 वर्षीय मुंबईच्या शयान राझमीने छत्तीसगडच्या दिग्विजय कडीयनचा 257-230 असा कडवा प्रतिकार करत विजय मिळवला. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत शयान व रयान राझमी या दोन्ही बंधुमध्ये सामना होणार आहे.
महाराष्ट्राच्या क्रिश गुरबकसानी याने पश्चिम बंगालच्या प्रियांश जैनचा 310-147 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. क्रिश याने नुकत्याच इंदोर येथे पार पडलेल्या सब-ज्युनियर राष्ट्रीय बिलियर्ड्स 2019 अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राच्या सुमेर मागोने उत्तराखंडच्या अक्षत गुसेन याचा 267-123 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सब-ज्युनियर(21वर्षाखालील) मुले: उपांत्यपूर्व फेरी:
क्रिश गुरबकसानी(महाराष्ट्र)वि.वि.प्रियांश जैन(पश्चिम बंगाल) 310-147;
रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.रणवीर दुग्गल(छत्तीसगड) 295-174;
शयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.दिग्विजय कडीयन 257-230;
सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.अक्षत गुसेन(उत्तराखंड)267-123;
ज्युनियर बिलियर्ड्स: पहिली पात्रता फेरी:
प्रकाश(तामिळनाडू)वि.वि.हार्दिक कुमार(उत्तरप्रदेश) 161-121;
उमर उल इस्लाम(जम्मू व काश्मीर)वि.वि.शाश्वत(तामिळनाडू) 284-101;
तरणदीप सिंग(उत्तरप्रदेश)वि.वि.आकाश बालाकृष्ण न(तामिळनाडू) 260-119.