पुणे: भारत अगेंस्ट करप्शन, राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती, हेमंत पाटील मित्र मंडळ, मुंबई यांच्या तर्फे आयोजित ७व्या हेमंत पाटील प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट लव्हर्स संघाने एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) संघाचा 93 धावांनी दणदणीत पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.
सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सुजीत उबाळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर क्रिकेट लव्हर्स संघाने एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) संघाचा 93 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना सुजूत उबाळेच्या 32 चेंडूत 42 धावा, रूषिकेश गायकवाडच्या 31 चेंडूत 48 धावा तर विशाल कार्ले याने 38 धावांच्या बळावर क्रिकेट लव्हर्स संघाने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुजीत उबाळे व मनोज यादव यांच्या अचूक गोलंदाजीपुढे एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी(अ) संघाचा डाव केवळ 19.1 षटकात सर्वबाद 89 धावांत गारद झाला. सुजीत उबाळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य व सनी ईलेव्हन क्रिडा प्रतिष्ठानचे संचालक जयंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरजीत भुजबळ, विशाल कसबे, एस. पालसूळे, हेमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.