पुणे: ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे ओम दळवी मेमोरिअल करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत धरणीधर मिश्रा याने पुरुष एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, हौशी दुहेरी गटात जॉय बॅनर्जी व राजेश मित्तल यांनी विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र पोलिस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकीत धरणीधर मिश्राने दुस-या मानांकीत पार्थ चिवटेचा 9-0 असा सहज पराभव करत विजेतेपद संपादन केले. याआधी उपांत्य फेरीत अव्वल मानांकीत धरणीधरने वेंकी आचार्यचा 9-3 असा पराभव केला.
पुरुष दुहेरी गटात अंतिम फेरीत धरणीधर मिश्राने आकाश खैफच्या साथीत मंदार वाकणकर व रोहित शिंदे या जोडीचा 6-3, 6-2 असा पराभव करत एकेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच या गटाचेही विजेतेपद राखले. उपांत्य फेरीत धरणीधर मिश्रा व आकाश खैफ यांनी बालाजी इरकल व संतोष एन यांचा 9-1 असा पराभव केला.
हौशी दुहेरी गटात अंतिम फेरीच्या लढतीत जॉय बॅनर्जी व राजेश मित्तल यांनी नितिन सावंत व रोहन यांचा 6-1, 6-3 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. उपांत्य फेरीत जॉय बॅनर्जी व राजेश मित्तल या जोडीने संग्राम सावंत व पारी एस यांचा 6-0, 6-0 असा पराभव केला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मछिंद्र बनसोडे व मारुती राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष एकेरी गट: उपांत्य फेरी:
धरणीधर मिश्रा(1)वि.वि.वेंकी आचार्य 9-3;
पार्थ चिवटे(2)वि.वि.संतोष कुरळे (4)9-5;
अंतिम फेरी- धरणीधर मिश्रा(1)वि.वि.पार्थ चिवटे(2)9-0;
पुरुष दुहेरी गट: उपांत्य फेरी:
मंदार वाकणकर/रोहित शिंदे वि.वि.राकेश झडपे/रोहित कुरडे 9-1;
धरणीधर मिश्रा/ आकाश खैफ वि.वि.बालाजी इरकल/संतोष एन 9-1;
अंतिम फेरी- धरणीधर मिश्रा/ आकाश खैफ वि.वि.मंदार वाकणकर/रोहित शिंदे 6-3, 6-2;
हौशी दुहेरी गट: उपांत्य फेरी:
जॉय बॅनर्जी/राजेश मित्तल वि.वि संग्राम सावंत/पारी एस. 6-0, 6-0;
नितीन सावंत/रोहन वि.वि.रवी कोठारी/अनिल कोठारी 6-3, 6-1;
अंतिम फेरी- जॉय बॅनर्जी/राजेश मित्तल वि.वि.नितीन सावंत/रोहन 6-1, 6-3.