पुणे ः पुण्याचा अनुवी आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले सलग दुसऱ्या वर्षी जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) फिनलंड रॅलीत सहभागी होईल. एक ते चार ऑगस्ट दरम्यान ही रॅली होईल. या आठवडाअखेर ही रॅली होत आहे. बाल्टीक मोटरस्पोर्ट्सने सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर2 कार तो चालवेल. ब्रिटनचा डॅरेन गॅरॉड नॅव्हीगेटर असेल, जो गिनेस विक्रमवीर आहे.
संजय फिनलंडमध्ये दाखल झाला असून त्याने मंगळवारी आणि बुधवारी रेकीमध्ये भाग घेतला. संजय डब्ल्यूआरसी3 विभागातील ज्यूनीयर आरसी4 गटात भाग घेईल. संजयने इस्टोनियातील रॅलीत पूर्वतयारीसाठी भाग घेतला होता. त्यावेळी त्याची कार बिघडली होती. त्यानंतर संघाच्या तंत्रज्ञांनी मेहनत घेऊन कार सुसज्ज केली. आता ही कार आणखी सुसज्ज झालेली असेल.
संजयने सांगितले की, जगातील सर्वाधिक खडतर आणि उत्कंठावर्धक रॅली अशी फिनलंडची ओळख आहे. त्यामुळे मी जागतिक पदार्पणासाठी याच रॅलीची निवड केली. गेल्या वर्षी रॅली पूर्ण करण्याचे प्राथमिक उद्दीष्ट पार केले. त्यानंतर आता अधिकाधिक वरचा क्रमांक मिळविण्याचे ध्येय आहे.
बारीक खडी आणि वाळूच्या मार्गामुळे ही रॅली वेगवान असते. जायवस्कीला परिसरातील स्टेजेसमध्ये जोरदार जम्प असतात. त्यामुळे ही रॅली आव्हानात्मक ठरते. त्यामुळे आगामी खडतर स्पर्धांसाठी रॅलीचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात करण्याची प्रक्रिया पुढे सुरू राहील असा संजयचा दृष्टिकोन आहे.
या रॅलीत सर्वाधिक आव्हान अचूक पेस नोट््सचे असेल. गेल्या वर्षी गॅरॉडच्या साथीत ड्रायव्हिंग केल्यानंतर यावेळी समन्वय आणखी सरस बनले अशी संजयची भूमिका आहे. तो म्हणाला की, येथे वेळाचा फरक फार नसतो. त्यामुळे काही सेकंदांची चूक फटका देते. अशावेळी नॅव्हीगेटरसह समन्वय साधणे महत्त्वाचे असते.
गॅरॉडने गेल्या वर्षी रुमानियात ब्रिटनच्या मार्क हिगीन्स याच्या साथीत विलक्षण आव्हानात्मक विक्रम केला. सुबारू डब्ल्यूआरएक्स एसटीआय कारसह 52.4 मैल अंतराच्या मार्गावरील तब्बल 624 वक्र भाग त्यांनी पार केले. त्यात तीव्र चढाचा मार्ग 1607 फुटांपासून 6699 फुटांपर्यंत वाढत होता.अशा मार्गावर साधी कार ताशी कमाल 25 मैल वेगाने जाऊ शकते, पण या जोडीने 40 मिनिटे 58.8 सेकंद वेळेत हा टप्पा पूर्ण केला. त्यांनी ताशी 76.69 मैल वेग राखला.
फिनलँड रॅली 2019
मार्गाचे स्वरुप ः बारीक खडीचा वेगवान मार्ग, पोटात गोळा आणणाऱ्या जम्प
परिसर ः जायवस्कीला शहरातील सरोवरे आणि जंगलातून जाणारा मार्ग
यंदाचा मार्ग ः हारजू येथे गुरुवारी 2.31 किलोमीटर अंतराची स्पेशल स्टेज, जेथे प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद. शुक्रवारी ऑट्टीला (19.34 किमी), मोक्सी (20.04), उरीया (12.28), असामाकी (12.33) आणि थोडा बदल असलेली अनेकोस्की (7.80) अशा स्टेजेस दोन वेळा. पुन्हा एकदा हारजू स्टेज. (एकूण अंतर 126.55)
शनिवारी 133 किमी अंतर. एकूण 14 तास मार्गावर असणार. जाम्सा येथे लेयूत्सू (10.50 किमी) ही नवी स्टेज. पीहलाजाकोस्की (14.42), पैजाला (22.78) आणि कॅकारीस्टो (18.7) अशा स्टेज. कॅकारीस्टो येथे औनीनपोहजा ही प्रसिद्ध जम्प.
रविवारी लौका (11.75), रुहीमाकी (11.12) अशा स्टेजेस. रुहीमाकीमघ्ये बोनस पॉईंट््स देणारी वोल्फ पॉवर स्टेज.
एकूण स्टेजेस ः 23
एकूण अंतर ः 307.22