निपुण धर्माधिकारी याचा बहुचर्चित ‘बापजन्म‘ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. ‘बापजन्म‘ या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटे ही पार्श्वगायनात पदार्पण करत आहे. हा तीचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ असे शब्द असणारे गाणे दीप्ती माटे यांनी गायले आहे. गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून असून संगीत दिग्दर्शक गंधार संगोराम यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
दीप्ती माटे या प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात आणि आघाडीचा तरूण शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची बहीण आहेत. मराठी नाट्यसृष्टीत संगीत नाटकांमधून दिसणाऱ्या दीप्ती यावेळी ‘बापजन्म’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण करत आहेत.
बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ या गाण्याच्या अनुभवाविषयी दीप्ती माटे म्हणाली कि ‘मी यापूर्वी नाट्य संगीत, त्याचबरोबर काही गझल व भावगीतेसुद्धा गायली आहेत. पण चित्रपटात कधीच गायन केले नव्हते. बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ हे गाणे गायले आहे ते फक्त संगीतकार गंधारमुळे. मला हे गाणे गायला खूपच भीती वाटत होती त्याला कारण असे होते कि माझ्या आजोबांनी व माझा भाऊ राहुल देशपांडे यांनी आमच्या घरातील गायकी इतक्या वर नेऊन ठेवली आहे कि त्याला माझ्या गाण्याने कुठे धक्का लागू नये असे मला सतत वाटत रहायचे. या गाण्याच्या संगीताची पार्श्वभूमी हि पस्तीस वर्षांपूर्वीची असल्यामुळे मला खूप दडपण आले होते. पण गंधार आणि राहुल या दोघांनी मला हे गाणे गायला भरपूर प्रोत्साहन दिले. या दोघांच्या पाठिंब्याशिवाय मी हे गाणे गाऊच शकले नसते. म्हणूनच मी गंधार आणि राहुलची खूप आभारी आहे’.
संगीत दिग्दर्शक गंधार संगोराम यांनी सांगितले की ‘मी आणि निपुणनी या अगोदर बऱ्याच संगीत नाटकांमधून एकत्र काम केले आहे. निपुण माझ्याकडे बापजन्म चित्रपटाची कथा घेऊन आला त्यावेळेस त्यांने मला चित्रपटात दोन गाणी असल्याचे सांगितले. त्यातील एक गाणे हे ३५ वर्षांपूर्वीच्या संगीतावर होते. म्हणजेच चित्रपटातील भास्कर पंडित यांच्या पत्नीने हे गाणे गाऊन ते रेकॉर्ड करून ठेवले आहे ते भास्कर पंडित नेहमी रेडिओवर ऐकत असतात अशी या गाण्याची पार्श्वभूमी होती. या गाण्यासाठी दीप्ती माटेच हीच माझी पहिली निवड होती. ‘मन शेवंतीचे फूल’ हे गाणे दीप्तीने एवढे सुंदर गायले आहे की तुम्हाला ते गाणे ऐकताना जुन्या गाण्याचा भास होईल. चित्रपटातील दुसरे गाणे गंध अजूनही हे जयदीप वैद्य याने गायले आहे. ते पण सुंदर झाले आहे.’
या चित्रपटाचे गाणं, टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. कास्टिंग काउच या वेबसीरिजच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटनी प्रस्तुत केलेला आणि सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्सन यांची निर्मिती असलेला ‘बापजन्म’ चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह या चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि अकर्श खुराणा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी. इतर तंत्रज्ञांचा चमू पुढीलप्रमाणे– छायाचित्रण दिग्दर्शक– अभिजित डी आबदे; संकलक– सुचित्रा साठे; संगीत आणि पार्श्वसंगीत– गंधार; गीते– क्षितीज पटवर्धन; ध्वनीरचना– अक्षय वैद्य; निर्मिती रचना– सत्यजित पटवर्धन; वेशभूषा– सायली सोमण; मेक-अप– दिनेश नाईक; विपणन– अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज); रंग– कलर-रेडचिलीज डॉट कॉम; व्हिज्युअल प्रमोशन्स– नवप्रभात स्तुडीओ; डिजिटल विपणन– बी बिरबल; प्रसिद्धी मोहीम– सचिन सुरेश गुरव.
‘बापजन्म’चे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.