पुणे, 6सप्टेंबर : एमिलियानो अल्फारो आणि मार्सिलीन्हो यांसारख्या खेळाडूंना लेन हुमे या स्टार खेळाडूंची जोड मिळाल्यामुळे एफसी पुणे सिटी हा अतिशय उच्च दर्जाचा संघ बनला आहे. तसेच, हा संघ यापूर्वी कधीही केली नसेल अशी ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास एफसी पुणे सिटी संघाच्या लेन हुमे याने व्यक्त केला आहे.
अल्फारो आणि मार्सिलीन्हो यांनी गेल्या 2 वर्षात आणि मी गेल्या 4वर्षात अनेक उपयुक्त गोल केले आहेत. तसेच, संघासाठी खडतर परिश्रम केले आहेत. त्यामुळे यंदाही आमच्याकडून भरपूर गोल करण्याची आणि इंडियन सुपर लीग स्पर्धा जिंकण्याची अपेक्षा सर्वजण करत आहेत. परंतु ते इतके सोपे नाही असे सांगून हुमे म्हणाला कि, यंदाच्या वर्षी लीग मध्ये अतिशय चुरस राहणार आहे. आम्ही पूर्वीप्रमाणेच आमच्या संघासाठी आवश्यक ते सर्वकाही करीत असून त्यात आणखीही भर घालणार आहोत. एफसी पुणे सिटी संघ गोवा येथे सुरु असलेल्या मौसमपूर्व सराव सत्रात तो बोलत होता.
कॅनडाच्या प्रमुख स्ट्राईकर लेन हुमे हा इंडियन सुपर लिगमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू असून त्याने 59सामन्यातून 28गोल केले आहेत. तो केरळा ब्लास्टर्स एफसी कडून एफसी पुणे संघात दाखल होत आहे.या मौसमासाठी आपला दर्जा कायम राखण्याचे आव्हान त्याच्यापुढे आहे.एफसी पुणे सिटी संघ माझ्या तंदरुस्तीसाठी सर्वकाही करत असून सर्व सामने खेळणे हेच प्रमुख लक्ष्य असल्याचे हुमे याने सांगितले.
हुमे सध्या कडक सराव सत्रातुन जात असून एफसी पुणे सिटी संघातील खेळाडू पाहता आम्ही किमान प्ले ऑफ फेरी गाठू असा विश्वास त्याने व्यक्त केला. आमच्याकडे अनुभवी आणि युवा खेळाडूंचे उत्तम मिश्रण असून प्रथम प्ले ऑफ आणि नंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले.
इतर स्टार खेळाडुंबरोबर आपला समावेश झाल्यामुळे एफसी पुणे सिटी संघ उपांत्य फेरी पलीकडे मजल मारू शकेल असा विश्वास त्याने व्यक्त केला. या मौसमात त्याच्या पूर्वीच्या केरळा किंवा कोची संघाशी लढत होण्याबाबत हुमे म्हणाला कि, या दोन्ही संघाच्या पाठिराख्यांचे प्रेम अनुभवले आहे. ते सगळीकडे आपल्या खेळाडू संघाला प्रोत्साहन देतात. तेथे जाऊन एफसी पुणे सिटी संघाकडून त्यांच्या विरुद्ध खेळणे सोपे नाही हे मला माहित आहे. पण तरीही आमच्याकडे योग्य कामगिरी करण्याच्या क्षमतेचा संघ आहे.