पुणे: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील क्लब एफसी पुणे सिटी संघाने आगामी २०१८-१९मौसमाकरिता स्पॅनिश मध्यरक्षक जोनाथन विला याचा संघात समावेश केल्याची घोषणा आज केली.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, जोनाथन हा अव्वल दर्जाचा मध्यरक्षक असून त्याला बचावफळीस साथ देत खेळणे आवडते. मध्यरक्षक असतानाही उत्कृष्ट बचाव करण्याची त्याची क्षमता आणि योग्य वेळी आक्रमण करण्याचे कौशल्य यामुळे आमच्यासाठी आदर्श खेळाडू ठरेल.
जोनाथन याने आपल्या युवा कारकिर्दीची सुरुवात सेल्टा दि वीगोकडून केली आणि त्यानंतर २००६मध्ये ला लीगकडून पदार्पण करताना २००६-०७मध्ये युईएफए करंडक स्पर्धा खेळला होता. सेल्टाकडून दहा वर्षे खेळताना २०१४मध्ये जोनाथन बिटर जेरुसलेम एफसी संघात सहभागी झाला. २०१७मध्ये स्पेनमध्ये रिक्रिएटिव्हो दि हुईलवा संघात सहभागी झाला.
एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक मिगुल एंजल पोर्तुगल म्हणाले की, जोनाथनची खेळी उत्कृष्ट आहे आणि एक मध्यरक्षक म्हणून त्याला प्रदीर्घ अनुभव असून त्याचा फायदा आमच्या संघासाठी नक्कीच होईल. आगामी मौसमासाठी त्याची निवड आमच्या संघासाठी योग्य असून तो संघाची जबाबदारी मैदानाच्या आत व बाहेर सांभाळेल अशी आशा आहे.
यावेळी जोनाथन विला म्हणाला कि, माझ्या कारकिर्दीतील हे नव्हे आव्हान असून भारतात खेळण्याचा हा माझा पहिलाच मौसम आहे. एका नव्या आव्हानाबरोबरच नवीन संस्कृती व जीवनशैली स्विकारण्याचे देखील आव्हान असणार आहे. माझ्या खेळाद्वारे चाहत्यांवर आणि क्लबवर नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणेल अशी आशा आहे.