पुणे- येथील लोहगाव विमानतळावर सुखोई विमानाचे टायर फुटल्याची घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. सुदैवाने इतर कोणताही अनर्थ घडला नसला, तरी या घटनेमुळे इतर विमानांच्या नियोजित उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे इतर विमानांच्या प्रवाशांच्या प्रतीक्षेत भर पडली आहे.
ऐन उड्डाणाच्या वेळी फुटले टायर
लोहगाव विमानतळावर उड्डाण घेत असतानाच सुखोई विमानाचे टायर फुटले. त्यामुळे धावपट्टीही खराब झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली आहे. प्रवाशांना विमानतळावरच थांबवण्यात आले असून यामुळे तेथे मोठी गर्दीही झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या घटनेविषयी विमानतळ व्यवस्थापनाकडून अद्याप ठोस माहिती देण्यात आलेली नाही. धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारीत असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे विमानतळ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
नियोजित उड्डाणांवर परिणाम
विमानाचा टायर फुटल्यामुळे धावपट्टी खराब झाली आहे. त्यामुळे इतर विमानांच्या उड्डाणांनाही अडचणी येत आहेत. परिणामी विमानतळ प्रशासनाने तत्काळ इतर उड्डाणेही थांबवली आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला असून त्यांना विमानतळावर बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. विमानतळाचे दिवसाचे 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्युल ठरलेले असते. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण शेड्युलवर परिणाम होणार आहे. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच प्रवाशांनाच सर्वाधिक बसणार आहे.
या आधीही घडली टायर फुटण्याची घटना
मार्च 2019 मध्येही हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे टायर लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर फुटले होते. तेव्हा जवळपास अडीच तास ते विमान धावपट्टीवरच उभे होते. परिणामी, लोहगाव विमानतळावरून होणारी हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. जवळपास 30 हून अधिक विमानांची ये-जा विलंबाने झाली होती. तेव्हा पुण्यात येणारी दोन विमाने अन्य शहरात वळविण्यात आली होती. यामुळे प्रवाशांची तेव्हाही मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती.

