- मेलबर्न युनिव्हसिर्टीद्वारा महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजुरपागा , नूमवि व मुलींची सैनिकी शाळा येथे कार्यशाळा ; हुजूरपागेची ऐतिहासिक इमारत, वसतिगृह व विविध विभागांना मेलबर्न युनिव्हर्सिटीच्या उपकुलगुरूंची भेट.
पुणे : हुजूरपागा शाळेमध्ये मेलबर्न युनिव्हर्सिटीद्वारा आयोजित केलेल्या ” शैक्षणिक गतिशीलता आणि यशस्वी करीयर ” ही कार्यशाळा पूर्ण केलेल्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी च्या हुजूरपागा, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची सैनिकी शाळा, शिक्षण प्रसारक मंडळाच्या नू म विच्या विद्यार्थीनींना प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय संस्कृती सांगणारे सांस्कृतिक कार्यक्रम हुजूरपागेच्या विद्यार्थीनींनी सादर केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दि युनिव्हर्सिटी आॅफ मेलबर्नचे उपकुलगुरू मायकेल वेस्ली, असिस्टंट उपकुलगुरु मुथूपंडीयन अशोककुमार, अमोईरा, ग्लोबल एज्युकेशन सोसायटीच्या राकुल श्राॅफ, सोसायटीच्या अध्यक्ष रेखा पळशीकर, सचिव वरदेंद्र कट्टी , मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, हिमानी गोखले, शालिनी पाटील विनया देशपांडे आदी उपस्थित होते. त्यांनी हुजूरपागेची ऐतिहासिक इमारत, वसतिगृह व विविध विभागांना भेट दिली.
मायकेल वेस्ली म्हणाले, महिलांमध्ये खूप क्षमता असतात, त्यांच्या क्षमता त्यांना स्वतःला कळायला हव्यात. ज्या क्षेत्रात महिला कार्यरत असतात तिथे त्या नक्कीच यशस्वी झालेल्या पहायला मिळतात. भारतीय महिलांमध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे, त्यामुळे भारत देश आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी सांगितले.
अशोक कुमार म्हणाले, मुलींना करीअरच्या माध्यमातून चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात. आपली स्वप्न कोणती आहेत, आपल्या सशक्त बाजू कोणत्या आहेत, आणि हे सर्व जाणून घेऊन भविष्यात कोणत्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करता येईल हे शालेय विद्यार्थींनींना समजण्यासाठी मेलबर्न युनिव्हर्सिटीने हुजूरपागा , नूमवि मुलींची शाळा व मुलींची सैनिकी शाळा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
रेखा पळशीकर म्हणाल्या, भारत आणि आॅस्ट्रेलिया मधील शाळांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व मजबूत संबंध निर्माण व्हायला हवेत. शैक्षणिक गतिशीलता आणि यशस्वी करीयर या विषयावर जशी कार्यशाळा झाली तशाच पद्धतीने सांस्कृतिक देवाण घेवाण देखील व्हायला हवी. तसेच विद्यार्थ्यांप्रमाणे टीचर एक्स्चेंज प्रोग्राम देखील राबवायला हवेत, असेही त्यांनी सुचविले.

