पुणे – शहर पोलिसांनी रविवारी संयुक्त कारवाई करून दोन आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींना अटक केली. त्यांच्याकडून रोख तब्बल एक कोटी रुपये रोकड जप्त केली आहे. सट्टाकिंग गणेश भिवराज भुतडा (वय ४८, रा. त्रिमूर्ती सोसायटी, रास्ता पेठ ) आणि अशोक भवरलाल जैन उर्फ देहूरोडकर ( वय ४८, रा. मार्केटयार्ड ) ही या दोघांची नावे आहेत. या कारवाईमुळे शहरालगतच्या बुकींनी रातोरात काढता पाय घेतला.

भुतडा व जैन क्रिकेट सामान्यावर सट्टा घेणारे मोठे बुकी म्हणून ओळखले जातात. सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांवर ते मोठी उलाढाल जगभरातून करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर गुन्हे अन्वेषण विभाग व सामाजिक सुरक्षा शाखेतील पथकांनी एकाचवेळी छापेमारी करून ही कारवाई केली.
या दोघांकडून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली. भुतडा आणि जैन यांच्याकडील डायर्या, मोबाईल आणि इतर काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यामध्ये अनेकांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. समर्थ व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईची चाहूल लागताच पिंपरी चिंचवड, लोणावळा आणि मुंबईतील काही मोठे बुक्की परागंदा झाल्याची चर्चा आहे. सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास जारी करण्यात आला आहे.
‘शहरातील सर्व कायदेबाह्य गोष्टींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील आहे. सट्टेबाजीची माहिती समजताच वेळ न दवडता आम्ही तत्काळ कारवाई केली. या प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.’
– पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
अशोक जैन हा १९९२ पासून क्रिकेट बेटिंग घेत असून आतापर्यंत तो कधी पोलिसांच्या रडारवर आला नव्हता. त्याचबरोबर तो सोन्याच्या देवाणघेवाणच्या व्यवहारातही असल्याचे समजते.
अशोक जैन हा बालाजी या आणखी एका बुकीच्या संपर्कात असलेल्या गिऱ्हाईकांकडून क्रिकेट बेटिंग करीता रक्कम घेऊन पुढे बालाजी व इतरांकडे वळवत असल्याचे आढळून आले. तसेच तो बेटिंग लावण्याकरीता १ रुपयांस एक रुपया या दराने बेटिंग घेत असल्याच्या नोंदी आढळून आल्या आहेत.गणेश भुतडा याच्या घरात तब्बल ९२ लाखांची रोकड आढळून आली. तो वापर असलेला मोबाईल हा दुसऱ्या एकाच्या नावावर असून त्याचा वापर बेटिंग घेण्यासाठी केला जात होता. गणेश भुतडा याचा हवाला रॅकेटशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे त्याच्या घरी एकावेळी ९२ लाख रुपये सापडले तरी त्याच्या असलेला संबंध लक्षात घेता ही रक्कम किरकोळ असल्याचे सांगण्यात येते.भुतडा याच्या मोबाईलमध्ये रविवारच्या सामन्याच्या २७ चिठ्ठ्या आढळून आल्या. त्या या चिठ्ठ्या इतर लोकांनी लिहून त्याचे फोटो काढून व्हॉटसॲपवर पाठविले होते. मोबाईलची तपासणी केल्यावर अशा प्रकारच्या चिठ्ठ्या अनेक दिवसांपासून मोबाईलमध्ये आढळून आल्या. त्यासमोर पैशांचा हिशोब असलेल्या चिठ्ठ्या संग्रहीत असल्याचे आढळून आले आहे. या दोघांकडे सापडलेल्या मोबईलमध्ये त्यांच्याकडे बेटिंग करणारे आणि त्यांच्याकडून पुढे बेटिंग घेणारे अशा अनेकांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता असून त्यातून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

