मुंबई-
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. तसेच, महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाल्याचे अनेक मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यानुसार, पुढील 15 दिवसांसाठी लॉकडाऊन असू शकतो. मात्र अधिकृतपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत माहिती देतील.
आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही- राजेश टोपे
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय उरला नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत घोषणा करतील.
कडक लॉकडाऊन हवा-एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राज्यात लॉकडाऊन लावला, तर तो अत्यंत कडक असला पाहिजे. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील’, असे शिंदे यांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन – अस्लम शेख
यावेळी मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख म्हणाले की, राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, बेड मिळत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल.