पुणे: आपल्या अभिजात नृत्य शैलीतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे- चापेकर तसेच आपल्या सुरेल गायकीतून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध गायक पं. राजेंद्र कंदलगावकर यांची एकल प्रस्तुती एकाच व्यासपीठावर अनुभाविण्याची अनोखी संधी पुणेकरांना लाभणार आहे.
शास्त्रीय कलेच्या प्रचार व प्रसाराच्या विधायक उद्देशाने कार्यरत असणाऱ्या स्ट्रेटलाईन एंटरटेन्मेंटतर्फे ‘आराधना’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि.९) नातू सभागृह, भारतीय विद्याभवन, सेनापती बापट रस्ता येथे सायंकाळी ६ वाजता ही मैफल रंगणार आहे अशी माहिती संस्थेचे श्री रसिक गुर्जर यांनी दिली.
डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या नृत्यप्रस्तुतीने मैफलीची सुरुवात होईल. यावेळी श्री ऋषीकेश बडवे(गायन), श्री. गोविंद भिलारे(पखवाज), श्री. आशय कुलकर्णी (तबला), श्री. चिन्मय कोल्हटकर(संवादिनी) तर श्री. सुनील अवचट (बासरी) साथसंगत करतील. पं. राजेंद्र कंदलगावकर यांच्या सुरेल गायकीने कार्यक्रमाची सांगता होईल. त्यांना श्री. अनिरुद्ध देशपांडे (तबला) व श्री. अभिजित पाटसकर (संवादिनी) साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन श्री. समाधान निकुंभ करतील. असेही श्री गुर्जर यांनी सांगितले.