पुणे- राज्य सरकारने पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याने रेल्वे मंत्रालयाने 231 किलोमीटरच्या या मार्गाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी खा. गिरीश बापट यांनी सोमवारी लोकसभेत केली. रेल्वे अर्थसंकल्पावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बापट यांनी पुणे विभागातील रेल्वेच्या समस्याही सभागृहात मांडल्या. ते म्हणाले की मुंबई-पुणे-नाशिक ही तीन औद्योगिक शहरे रेल्वेने जोडण्याबाबत बरीच वर्षे चर्चा चालू आहे. त्यापैकी पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेने जोडण्यास राज्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे.म्हणून रेल्वे मंत्रालयाने हे काम तातडीने सुरू करावे. अशी पुणेकरांची मागणी आहे. तसेच विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये सुसंवाद व सुसूत्रता आणण्याची गरज आहे. तसा संवाद नसल्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले आहेत.विशेषतः पुणे मिरज लोंढा हा 467 किलोमीटरचा मार्ग 2015- 16 या वर्षात मंजूर झाला आहे. तथापि भूसंपादन न झाल्याने हा प्रकल्प रेंगाळला आहे.बापट पुढे म्हणाले की पुण्याहून लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. पुणे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक शैक्षणिक व आय टी हब आहे. म्हणून पुण्याहून अन्य राज्यात रेल्वेचे जाळे निर्माण करण्याचा विचार रेल्वे खात्याने करावा अशी आमची मागणी आहे. खासदार बापट यांनी किसान रेल योजना सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी कौतुक केले. सात ऑगस्ट 2020 रोजी पहिली किसान रेल्वे धावली. चार महिन्यात या योजनेतील शंभरावी गाडी पश्चिम बंगालमधून महाराष्ट्रातील संगोला या मार्गावर धावली. आत्तापर्यंत किसान रेल योजनेतून 27 हजार टन कृषी उत्पादनाची वाहतूक झाली.या रेल्वेमुळे शेतीला प्रोत्साहन मिळाले आहे. आता देशभरातील शेतकरी कुठेही शेतमाल पाठवू शकतो. रेल्वे सारखे प्रचंड मोठे खाते चालविणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. 7400 रेल्वे स्टेशन्स दोन कोटी तीस लाख प्रवाशांची ने-आण आणि पंधरा लाख कर्मचाऱ्यांचे सहकार्य याच्या आधारे संपूर्ण देशभर रेल्वे चालवणे हे खूप मोठे अवघड काम आहे. ते समर्थपणे चालवल्याबद्दल रेल्वे मंत्रालय अभिनंदनास पात्र आहे. रेल्वे मंत्रालयाने यावर्षी अर्थसंकल्पात एकशे दहा लाख कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 25 टक्के अधिक आहे. त्यामुळे रेल्वे चा व्यवसाय प्रगतिपथावर राहील. याची मला खात्री वाटते
पुणे-नाशिक रेल्वेचे काम सुरू करा – खा.बापट यांची लोकसभेत मागणी
Date:

