पुणे -आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारे पुण्याचे सुपुत्र निळूभाऊ फुले, तसेच साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे कादंबरीकार शंकरराव खरात यांच्या नावाने पुणे महानगरपालिकेने पुरस्कार सुरू करावा, अशी विनंती आज भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी त्यांच्यासोबत माजी उपमहापौर प्रसन्न जगताप ही उपस्थित होते.
निवेनात म्हटले आहे की, पुण्याचे सुपुत्र असलेले निळूभाऊ फुले यांनी त्यांच्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या मृत्युनंतर आजही अभिनय क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पडद्यावर खलनायक साकारणाऱ्या या व्यक्तीने समाजकल्याणासाठी अनेक कामे केली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील होते. त्यामुळे रंगभूमीची तसेच समाजाची सेवा करणाऱ्या या अभिनेत्याच्या नावाने पुणे महानगर पालिकेमार्फत प्रतीवर्षी एखाद्या कलावंताला पुरस्कार देण्यात यावा.
त्याचप्रमाणे शंकरराव खरात यांनी साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कादंबरीकार व इतिहासकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आंबेडकरी चळवळतील ते प्रमुख लेखक होते. शंकरराव खरात यांचे पुण्यात वास्तव्य होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत त्यांनी काम केले होते. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ही त्यांनी उत्तम कामकाज पहिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाने पुणे महानगरपालिकेमार्फत साहित्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तिला प्रतीवर्षी हा पुरस्कार देण्यात यावा.
विविध क्षेत्रातील संस्था, संघटना पुरस्कार देतात पण पुणे महानगरपालिकेमार्फत दिला जाणारा पुरस्कार हा पुणे पुणेकरांच्यावतीने अधिकृत रित्या समजला जातो. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत हा पुरस्कार सुरू करावा.

